वानखेडेवर यंदा विजयारंभ? मुंबई इंडियन्सची आज कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ; बुमरा उपलब्ध

आज आयपीएलमध्ये मुंबईची कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ पडणार असून या लढतीसाठी तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा उपलब्ध असल्याने मुंबईची ताकद बळावली आहे.
वानखेडेवर यंदा विजयारंभ? मुंबई इंडियन्सची आज कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ; बुमरा उपलब्ध
वानखेडेवर यंदा विजयारंभ? मुंबई इंडियन्सची आज कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ; बुमरा उपलब्धX
Published on

मुंबई : तब्बल पाच वेळा इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सला गेल्या १३ वर्षांत सलामीचा सामना जिंकण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच यंदा वानखेडेवर आपल्या अभियानाचा प्रारंभ करताना मुंबईचा संघ ही पराभवाची मालिका संपुष्टात आणून विजयी श्रीगणेशा करण्यासाठी उत्सुक असेल. रविवारी आयपीएलमध्ये मुंबईची कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ पडणार असून या लढतीसाठी तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा उपलब्ध असल्याने मुंबईची ताकद बळावली आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी २० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. आता २० दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसणार आहेत. आयपीएलच्या १९व्या पर्वाला शनिवारी प्रारंभझाला. आता रविवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात मुंबई-कोलकाता यांच्यातील द्वंद्व चाहत्यांना पाहायला मिळेल. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळताना मुंबईला गतवर्षी क्वालिफायर-२मध्ये Re पराभव पत्करावा लागला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या मुंबईला यंदा जेतेपदाचा षटकार लगावण्याची उत्तम संधी आहे. कारण भारताने नुकताच जिंकलेल्या टी-२० विश्वचषकातील चार सदस्य म्हणजेच हार्दिक, सूर्यकुमार, तिलक वर्मा आणि बुमरा मुंबईच्या ताफ्यात आहेत. त्याशिवाय रोहित शर्माचा अनुभव आहेच. बुमरा शुक्रवारीच मुंबईत दाखल झाला. शनिवारी पत्रकार परिषदेत प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी बुमरा रविवारी खेळणार असल्याचे सांगितले. मिचेल सँटनर आणि विल जॅक्स हे दोघे मात्र काही लढतींना मुकणार आहेत.

मजेशीर बाब म्हणजे मुंबईला गेल्या पाच वर्षांत एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे यावेळी ते ही कसर भरून काढण्यास आतुर असतील. २०१२ मध्ये मुंबईने आयपीएलमध्ये पहिला सामना जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर गेली १३ वर्षे त्यांना पहिल्या लढतीत पराभवालाच सामोरे जावे लागले आहे. 'अपयश ही यशाची पहिली पायरी आहे,' यावर मुंबईचा भरवसा असल्याचे दिसून येते. त्यांनी २०१३ ते २०२० या काळात पाच जेतेपदे मिळवली आहेत. मात्र किमान यंदा तरी वानखेडेवर मुंबई विजयारंभकरणार, अशी चाहत्यांची आशा आहे. गतवर्षी मुंबईने कोलकाताला वानखेडेवर नमवले होते, हे विशेष. विदेशी फलंदाजांचा विचार करता मुंबईकडे क्विंटन डीकॉक, शर्फेन रुदरफोर्ड, रायन रिकल्टन यांचे पर्याय उपलब्ध आहेत. गोलंदाजीत बुमरासह ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, शार्दूल ठाकूर अशी वेगवान चौकडी व अल्लाह गझनफर, मयांक मार्कंडे यांची फिरकी जोडी मुंबईकडे आहे.

दुसरीकडे मुंबईकर अजिंक्य रहाणे कोलकाताचे सलग दुसऱ्या हंगामात नेतृत्व करणार आहे. कोलकाताला गतवर्षी साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. यंदा मात्र हा तीन वेळचा विजेता संघ नव्याने संघबांधणी करून छाप पाडण्यास आतुर असेल. लिलावात कोलकाताने फिन अॅलन, टिम सेईफर्ट, कॅमेरून ग्रीन असे काही धडाकेबाज फलंदाज ताफ्यात घेतले. मात्र त्यांना गोलंदाजांच्या चिंतेने सतावले आहे. हर्षित राणा व आकाश दीप दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेले आहेत. तर मुस्तफिझूर रहमानला स्पर्धेतून काढून टाकण्यात आले आहे. मथीशा पाथिराना अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. अशा स्थितीत प्रामुख्याने वरुण चक्रवर्ती व सुनील नरिन या फिरकीपटूंवर कोलकाताची भिस्त असेल. फलंदाजीत रहाणे, उपकर्णधार रिंकू सिंग, मनीष पांडे, रमणदीप सिंग या भारतीय फलंदाजांकडून कोलकाताला अपेक्षा असतील. आंद्रे रसेलच्या निवृत्तीचा फटका कोलकाताला बसू शकतो.

उभय संघांत आतापर्यंत आयपीएलमध्ये ३५ सामने झाले असून मुंबईने त्यापैकी तब्बल २४ लढती जिंकल्या आहेत, तर कोलकाताने ११ सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे कागदावर तरी मुंबईचेच पारडे जड दिसत आहे.

खेळपट्टीचा अंदाज

वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच पोषक असते. विश्वचषकात येथे भारत आणि वेस्ट इंडिज या संघांनी २५०हून अधिक धावसंख्या उभारली. तसेच रात्री ८ वाजल्यानंतर मैदानात दव येण्याची शक्यता असल्याने धावांचा पाठलाग करणे सोपे जाऊ शकते.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, अथर्व अंकोलेकर, कॉर्बिन बोश, दानिश मलेवार, दीपक चहर, मयांक मार्कंडे, मयांक रावत, मिचेल सँटनर, मोहम्मद इझार, नमन धीर, क्विंटन डीकॉक, रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, शार्दूल ठाकूर, शर्फेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स.

कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग (उपकर्णधार), फिन अॅलन, तेजस्वी दहिया, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, रोवमन पॉवेल, सार्थक रंजन, टिम सेईफर्ट, राहुल त्रिपाठी, दक्ष कामरा, सुनील नरिन, अनुकुल रॉय, कॅमेरून ग्रीन, रचिन रवींद्र, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझरबानी, प्रशांत सोलंकी, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी, मथीशा पाथिराना, उमरान मलिक, नवदीप सैनी.

logo
marathi.freepressjournal.in