मुंबई : पाच वेळा जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मात्र ते अन्य संघांचा मार्ग कठीण करू शकतात. सोमवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर याच निर्धाराने मुंबईचे खेळाडू सनरायजर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरतील. उभय संघांतील या लढतीत चौकार-षटकारांची उधळण अपेक्षित आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबईचा संघ सध्या ११ सामन्यांतील अवघ्या ३ विजयांच्या ६ गुणांसह गुणतालिकेत तळाशी म्हणजेच १०व्या स्थानी आहे. उर्वरित ३ सामने जिंकून किमान प्रतिष्ठा राखण्याचे मुंबईचे उद्दिष्ट असेल. तसेच मुंबईच्या संघातील सर्वाधिक ४ खेळाडूंचा टी-२० विश्वचषकाासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. अशा स्थितीत त्या खेळाडूंना पुरेशी विश्रांती देण्याचाही संघ व्यवस्थापन विचार करेल. मुंबई-हैदराबादमध्ये या पर्वात पहिल्या टप्प्यातील सामन्यात हैदराबादने २७७ धावांचा डोंगर उभारला होता. मुंबईनेसुद्धा २४६ धावांपर्यंत मजल मारून झुंज दिली होती. आता मुंबई त्या पराभवाचा वचपा घेणार का, हे पाहावे लागेल.
दुसरीकडे पॅट कमिन्सच्या हैदराबादने १० पैकी ६ लढती जिंकून गुणतालिकेत पाचवे स्थान टिकवले आहे. गेल्या लढतीत हैदराबादने अग्रस्थानावरील राजस्थानला १ धावेने नमवले. उर्वरित चारपैकी किमान दोन ते तीन लढती जिंकण्याचे हैदराबादचे ध्येय असेल. तसेच वानखेडेवरील खेळपट्टी व मैदानाचा विचार करता त्यांच्या फलंदाजीची फळी अधिक धोकादायी ठरू शकते. कोलकाताविरुद्धच्या लढतीत १७० धावांचा पाठलागही झाला नाही. तसेच दवाचा फारसा परिणाम जाणवला नाही. अशा स्थितीत प्रथम फलंदाजी करणेही सोयीचे ठरू शकते.
रोहित, बुमराला विश्रांती; अर्जुनला संधी?
२ जूनपासून रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने रोहित शर्मा व जसप्रीत बुमरा या दोन महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार मुंबई करू शकते. रोहितला गेल्या सामन्यात पाठदुखीही झाली होती. तसेच डावखुरा मध्यमगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला हंगामातील पहिला सामना खेळायला मिळू शकतो. फलंदाजीत मुंबईची प्रामुख्याने सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा या दोघांवरच भिस्त आहे. रोहित व इशान किशन यांना कामगिरीत सातत्य राखता आलेली नाही. तर हार्दिकने सातत्याने निराशा केली आहे. गोलंदाजीत बुमरा व कोएट्झेवर मुंबई अवलंबून आहे. तसेच नुवान थुशाराने छाप पाडली आहे. मात्र फिरकीपटू पियूष चावलाचे अपयश संघाला महागात पडत आहे.
हेड, क्लासेनला रोखण्याचे आव्हान
हैदराबादसाठी ट्रेव्हिस हेड आणि हेनरिच क्लासेन या विदेशी जोडीने या हंगामात तुफानी फलंदाजी केली आहे. त्याशिवाय अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी हे भारतीय फलंदाजही योगदान देत आहेत. त्यामुळे मुंबईच्या तुलनेत हैदराबादची फलंदाजी नक्कीच लयीत आहे. एडीन मार्करम व अब्दुल समद यांच्याकडूनही संघाला मोठी खेळी अपेक्षित आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन व कमिन्स या वेगवान त्रिकुटावर हैदराबादची भिस्त आहे. फिरकीपटू शाहबाज अहमद व मयांक मार्कंडेसुद्धा संधी मिळाल्यास चमक दाखवत आहेत. जयदेव उनाडकट व अनमोलप्रीत सिंगपैकी एक त्यांच्यासाठी इम्पॅक्ट प्लेअरची भूमिका बजावेल.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, पियूष चावला, शम्स मुलाणी, जसप्रीत बुमरा, जेराल्ड कोएट्झे, ल्यूक वूड, श्रेयस गोपाळ, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, क्वेना माफका, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान थुशारा, नेहल वधेरा, हार्विक देसाई.
सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, मयांक अगरवाल, आकाश सिंग, अनमोलप्रीत सिंग, फझलहक फारुकी, ट्रेव्हिस हेड, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, एडिन मार्करम, टी. नटराजन, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, शाहबाज अहमद, जठवेध सुब्रमण्यम, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, विजयकांत वियासकांत.