आमदार चषक कबड्डी स्पर्धा; युवा फलटण, राजमाता जिजाऊ संघ विजयी

इन्सोअर कोटचा आदित्य शिंदे पुरुषांत, तर राजमाता जिजाऊची सलोनी गजमल महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले
आमदार चषक कबड्डी स्पर्धा; युवा फलटण, राजमाता जिजाऊ संघ विजयी

क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी श्रीमान योगी प्रतिष्ठान व साई क्रीडा मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गटात मुंबई शहराच्या युवा फलटण (इन्सोअर कोट) संघाने, तर स्थानिक महिलांत पुण्याच्या राजमाता जिजाऊने विजेतेपदाचा किताब पटकावला. इन्सोअर कोटचा आदित्य शिंदे पुरुषांत, तर राजमाता जिजाऊची सलोनी गजमल महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. आदित्यला ‘मोटर बाईक’, तर सलोनीला ‘स्कुटी’ देऊन गौरविण्यात आले.

कांजूरमार्ग पूर्व येथील परिवार मनोरंजन मैदानातील मॅटवर संपन्न झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात युवा फलटणने भारत पेट्रोलियमचा कडवा प्रतिकार ४०-३३ असा मोडून काढत चषक व रोख एक लाख आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या भारत पेट्रोलियामला चषक व रोख ७५ हजारांवर समाधान मानावे लागले. आदित्य शिंदेने तुफानी चढाया करीत या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याला चढाईत वैभव कांबळेची, तर पकडीत बदल सिंगची उत्तम साथ लाभली.

महिलांचा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळला गेला. श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात अखेर राजमाता जिजाऊ संघाने शिवशक्तीला ३०-२९ असे चकवून चषक व ५१ हजार पटकावले. उपविजेत्या शिवशक्तीला चषक व ३५ हजारांवर समाधान मानावे लागले. सलोनी गजमल, मंदिरा कोमकर यांच्या चढाया, तर ऋतुजा निगडेच्या पकडी या विजयात महत्वपूर्ण ठरल्या. पूजा यादव, साधना विश्वकर्मा, पौर्णिमा जेधे यांचा खेळ शिवशक्तीचा पराभव टाळण्यात कमी पडला.

पुरस्कार विजेते : पुरुष विभाग

डावा मध्यरक्षक - अरकम शेख (भारत पेट्रोलियम)

उजवा मध्यरक्षक - नितीन देशमुख (मिडलाईन)

डावा कोपरारक्षक - गिरीश इरनाक (भारत पेट्रोलियम)

उजवा कोपरारक्षक - दादासो पुजारी (इन्सोअर कोट)

पुरस्कार विजेते : महिला विभाग

डावा मध्यरक्षक - साधना विश्वकर्मा (शिवशक्ती)

उजवा मध्यरक्षक - ऋतुजा निगडे (राजमाता जिजाऊ)

डावा कोपरारक्षक - सायली जाधव (महात्मा गांधी)

उजवा कोपरारक्षक - पौर्णिमा जेधे (शिवशक्ती)

logo
marathi.freepressjournal.in