
नागपूर : जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेला मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा उपांत्य सामना रंगतदार अवस्थेत आहे. ४०६ धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईची चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३१ षटकांत ३ बाद ८३ अशी स्थिती आहे. त्यामुळे मुंबईचा संघ शुक्रवारी पाचव्या दिवशी उर्वरित ३२३ धावा करणार की विदर्भ सात बळी मिळवून धडाक्यात अंतिम फेरी गाठणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
उभय संघांतील या लढतीत बुधवारी मुंबईचा पहिला डाव ९२ षटकांत २७० धावांत संपुष्टात आला. त्यामुळे विदर्भाला पहिल्या डावात ११३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर विदर्भाने दुसऱ्या डावात ५३ षटकांत ४ बाद १४७ धावांपर्यंत मजल मारली होती. तेथून पुढे गुरुवारी चौथ्या दिवसाला प्रारंभ करताना यश राठोडने स्पर्धेतील तब्बल पाचवे शतक झळकावले. त्याने ११ चौकारांसह २५२ चेंडूंत १५१ धावांची खेळी साकारली. तसेच कर्णधार अक्षय वाडकरने ५२ धावांचे योगदान दिले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी रचली. मात्र शम्स मुलाणीने वाडकरचा अडसर दूर करून ही जोडी फोडली.
त्यानंतर शम्सने तळाच्या फलंदाजांनाही बाद करून एकूण सहा बळी मिळवले. त्याने यंदाच्या रणजी स्पर्धेत एकूण ४४ बळी मिळवले असून यामध्ये त्याने ३ वेळा डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक गडीदी बाद केले. तनुष कोटियनने यशला बाद करून विदर्भाचा दुसरा डाव ११०.१ षटकांत २९२ धावांवर संपुष्टात आणला. पहिल्या डावातील ११३ धावांच्या आघाडीमुळे विदर्भाने मुंबईपुढे विजयासाठी ४०६ धावांचे लक्ष्य ठेवले.
अखेरच्या सत्रात मुंबईकडून चमकदार फलंदाजी अपेक्षित होती. मात्र आयुष म्हात्रे (१८), सिद्धेश लाड (२) व कर्णधार अजिंक्य रहाणे (१२) यांनी निराशा केली. त्यामुळे चौथ्या दिवसअखेर मुंबईची ३ बाद ८३ अशी स्थिती असून पहिल्या डावातील शतकवीर आकाश आनंद २७, तर शिवम दुबे १२ धावांवर नाबाद आहे. तसेच सूर्यकुमार यादव, शार्दूल ठाकूर, तनुष व शम्स फलंदाजीस येणे बाकी आहेत. त्यामुळे मुंबईला ९० षटकांत ३२३ धावा करणे अशक्य नाही. रणजी स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करण्याचा विक्रम रेल्वेच्या नावावर आहे. त्यांनी गतवर्षी त्रिपुराविरुद्ध ३७८ धावा केल्या होत्या. त्यामुळे मुंबईला हा विक्रम मोडण्याची संधी आहे.
गुजरातला आघाडीसाठी २८ धावांची आवश्यकता
गुजरात-केरळ यांच्यात अहमदाबाद येथे सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी गुजरातला आणखी २८ धावांची गरज आहे. तर केरळला त्यांचे उर्वरित ३ फलंदाज बाद करायचे आहेत. त्यामुळे या लढतीचा पाचवा दिवस निर्णायक ठरणार आहे. केरळच्या पहिल्या डावातील ४५७ धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातने चौथ्या दिवसअखेर १५४ षटकांत ७ बाद ४२९ धावा केल्या आहेत.