मुंबई खिलाडीज साखळी फेरीतच गारद! चेन्नई क्वीक गन्सकडून ४१-१८ असा दारुण पराभव; गुजरातची तेलुगूवर मात

कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले.
मुंबई खिलाडीज साखळी फेरीतच गारद! चेन्नई क्वीक गन्सकडून ४१-१८ असा दारुण पराभव; गुजरातची तेलुगूवर मात

भुवनेश्वर : मुंबई खिलाडीज संघाला सलग दुसऱ्या हंगामात अल्टिमेट खो-खो लीगची बाद फेरी गाठण्यात अपयश आले. चेन्नई क्वीक गन्सने अनिकेत पोटेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईला ४१-१८ अशी धूळ चारून त्यांचे आव्हान संपुष्टात आणले.

कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले. या सामन्यातील पहिल्या टर्नमध्ये मुंबईच्या प्रतिक देवारेला दुर्वेश साळुंकेने, एम. शिबिनला रामजी कश्यपने आकाशीय सूर मारत बाद केले, तर हृषिकेश मुर्चावडेला सुरज लांडेने सहज बाद केले व ही तुकडी २.४० मिनिटात बाद झाली. दुसऱ्या तुकडीतील एस. श्रीजेशला सुरज लांडेने व पी. शिवा रेड्डीला आकाश कदमने आकाशीय सूर मारत बाद केले तर गजानन शेंगाळला सचिन भार्गोने सहज बाद केले. तिसऱ्या तुकडीतील सागर पोतदारला रामजी कश्यपने स्तंभात बाद केले तर अनिकेत पोटेला विजय शिंदेने सहज बाद केले व संघाला १६ गुण मिळवून दिले.

दुसऱ्या टर्नमध्ये चेन्नईच्या पहिल्या तुकडीतील रामजी कश्यपला (२.०१ मि, संरक्षण) गजानन शेंगाळने आकाशीय सूर मारत बाद केले, त्यानंतर मदनला (१.०९ मि. संरक्षण) हृषिकेश मुर्चावडेने पकडले. त्यापूर्वी मदनने ड्रीम रन्सचे दोन गुण मिळवले. विजय शिंदेला (२.०४ मि. संरक्षण) हृषिकेश मुर्चावडेने सहज स्पर्शाने बाद केले, पण त्यापूर्वी विजय शिंदेने ड्रीम रन्सचे ४ गुण मिळवून दिले व संघाला मजबूत स्थिती मिळवून दिली. दुसऱ्या तुकडीतील सचिन भार्गोला एस. श्रीजेशने सहज बाद केले व मध्यंतराला चेन्नई क्विक गन्सने मुंबईवर २२-८ अशी १४ गुणांची आघाडी घेतली होती. हीच नंतर निर्णायक ठरली.

दिवसातील दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सने तेलुगू योद्धाजचा ४२-२२ असा पराभव केला. राम मोहन त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. चेन्नई गुणतालिकेत अग्रस्थानी विराजमान आहे, तर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in