मॅरेथॉनच्या निमित्ताने मुंबई धावली!

२००४पासून जानेवारी महिन्यातील तिसऱ्या रविवारी दरवर्षी टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते.
मॅरेथॉनच्या निमित्ताने मुंबई धावली!

मुंबई : दिवसागणिक वाढणारी थंडी, प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे लागलेले वेध, उत्साह आणि वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर विक्रमी धावपटूंच्या साक्षीने रविवारी टाटा मुंबई मॅरेथॉनचे १४वे पर्व दणक्यात पार पडले. यंदा ५९ हजारांहून अधिक धावपटूंनी भाग घेतलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये अपेक्षेप्रमाणे विदेशी गटात इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व अबाधित राहिले. भारतीय पुरुषांच्या एलिट गटात यावेळी श्रीनू बुगाथाने माजी मारली, तर महिलांमध्ये निरमाबेन ठाकोरने विजेतेपद पटकावले. अर्ध-मॅरेथॉनमध्ये (२१ किलोमीटर) बुलढाण्याच्या पूनम सोनुणेने दुसरा क्रमांक काबिज केला.

२००४पासून जानेवारी महिन्यातील तिसऱ्या रविवारी दरवर्षी टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. २०२१ व २०२२मध्ये कोरोनामुळे ही स्पर्धा झाली नव्हती. २०२३मध्ये मात्र पुन्हा या स्पर्धेने झोकात पुनरागमन केले. त्यावेळीसुद्धा इथिओपिया, केनियाच्या धावपटूंनी त्यांचा दबदबा कायम राखला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास श्रीरामाची छबी असलेला झेंडा दर्शवून यंदाच्या मुंबई मॅरेथॉनला प्रारंभ केला.

विदेशी पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये इथिओपियाच्या हायले लेमीने सलग दुसऱ्यांदा अग्रस्थान मिळवण्याचा पराक्रम केला. त्याने २ तास, ०७.५० मिनिटांत ४२ किलोमीटरचे अंतर सर केले. इथिओपियाच्याच हायमनोत अल्यू (२ तास, ०९.०३ मिनिटे) आणि मिटकू ताफा (२ तास, ०९.५८ मिनिटे) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले. महिलांच्या एलिट गटात इथिओपियाच्या ॲबेर्श मिन्सेवूने २ तास, २६.०६ मिनिटांत ४२ किमीचे अंतर गाठून प्रथम क्रमांक पटकावला. मुलुहब्त सेगा (२ तास, २६.५१ मिनिटे) आणि मेहदीन बेज्ने (२ तास, २७.३४ मिनिटे) या इथिओपियाच्या अन्य धावपटू अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या.

चाहत्यांना मात्र उत्सुकता होती ती भारतीय धावपटूंची. यंदा पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुषांच्या एलिट गटात श्रीनूने तब्बल ४ वर्षांनी धडाकेबाज पुनरागमन केले. २०२०मध्येही आंध्र प्रदेशचा श्रीनू या गटात विजेता ठरला होता. यंदा त्याने गतवर्षीचा विजेता गोपी थॉनक्कलला पिछाडीवर टाकताना २ तास १७.२९ मिनिटांत शर्यत पूर्ण केली. दुसऱ्या क्रमांकावरील गोपीने २ तास १८.३७ मिनिटांचा अवधी घेतला. शेर सिंग तन्वरने २ तास, १९.३७ मिनिटांसह तिसरा क्रमांक प्राप्त केला. श्रीनू व गोपीने एलिट धावपटूंच्या एकंदर शर्यतीचा आढावा घेतल्यास अनुक्रमे आठवे व १०वे स्थान मिळवण्याची किमया साधली. साताऱ्याच्या कालिदास हिरवेला यंदा पदकाने हुलकावणी दिली. गतवर्षी कांस्यपदक जिंकणाऱ्या कालिदासला यावेळी २ तास २४.२५ मिनिटांसह चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.

भारतीय महिलांच्या एलिट गटात गुजरातच्या निरमाबेनने २ तास, ४७.११ मिनिटे अशी वेळ नोंदवून सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. रेश्मा कवटेने ३ तास ०३.३४ मिनिटांसह रौप्य, तर श्यामली सिंगने ३ तास, ०४.३५ मिनिटांसह कांस्यपदकाला गवसणी घातली. रेश्माला शर्यत पूर्ण केल्यानंतर चक्कर आल्याने ती पदक स्वीकारण्यासाठी उपस्थित नव्हती. अर्ध-मॅरेथॉनमध्ये सावन बरवालने पुरुषांमध्ये, तर अमृता पटेलने महिलांमध्ये विजेतेपद मिळवले.

हिरवा नव्हे, तर श्रीरामाचा झेंडा

या स्पर्धेला शुभारंभ करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरव्याऐवजी श्रीरामाची छबी असलेला झेंडा दर्शवल्याने याविषयी सगळीकडे चर्चा रंगत आहे. विरोधकांनी यावर टीका केली आहे, तर काहींनी याचे कौतुकही केले आहे. दरम्यान, या स्पर्धेत धावताना खाली कोसळल्यामुळे २ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तसेच काही धावपटूंची पदके तसेच किटबॅग चोरीला गेल्याची माहितीही आयोजकांनी दिली. याशिवाय काहींना वाहतुकीदरम्यान असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले. .

गुजरातमधून नाशिकला सरावासाठी स्थलांतर केल्यावर माझी कामगिरी उंचावली. माझ्या शेतकरी वडिलांनी माझ्या सरावाकरिता पैसे जमा करण्यात फार कष्ट सोसले आहेत. त्यामुळे हे यश मी त्यांना समर्पित करते. ऑलिम्पिकची पात्रता मिळवण्याचे माझे ध्येय आहे.

- निरमाबेन ठाकोर

चार वर्षांनी पुनरागमन करताना ही स्पर्धा जिंकणे स्वप्नवत आहे. काही वर्षांपूर्वी बाइकवरून अपघात झाल्यामुळे मला एकवेळ धावणे सोडण्याचा विचार आला. मात्र कुटुंबीयांच्या पाठबळामुळे मी पुन्हा धावण्याकडे वळलो.

- श्रीनू बुगाथा, भारतीय विजेता

विजेत्यांची यादी

पूर्ण मॅरेथॉन (४२ किलोमीटर)

भारतीय पुरुष

१. श्रीनू बुगाथा (२ तास, १७.२९ मिनिटे)

२. गोपी थोनक्कल (२ तास, १८.३७ मिनिटे)

३. शेर सिंग तन्वर (२ तास, १९.३७ मिनिटे)

भारतीय महिला

१. निरमाबेन ठाकोर (२ तास, ४७.११ मिनिटे)

२. रेश्मा केवटे (३ तास, ०३.३४ मिनिटे)

३. श्यामली सिंग (३ तास, ०४.३५ मिनिटे)

पूर्ण मॅरेथॉन (४२ किलोमीटर)

विदेशी धावपटू (पुरुष)

१. हायले लेमी (२ तास, ०७.५० मिनिटे)

२. हायमनोत अल्यू (२ तास, ०९.०३ मिनिटे)

३. मिटकू ताफा (२ तास, ०९.५८ मिनिटे)

विदेशी धावपटू (महिला)

१.ॲबेर्श मिन्सेवू (२ तास, २६.०६ मिनिटे)

२. मुलुहब्त सेगा (२ तास, २६.५१ मिनिटे)

३. मेहदीन बेज्ने (२ तास, २७.३४ मिनिटे)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in