रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुलानीमुळे मुंबई अग्रस्थानी! हिमाचल प्रदेशवर एका डावाच्या फरकाने वर्चस्व; बोनस गुणाचीही कमाई

मुंबईचा डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने (३७ धावांत ५ बळी) दुसऱ्या डावात प्रभावी गोलंदाजी केली. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईने हिमाचल प्रदेशचा एक डाव आणि १२० धावांच्या फरकाने तिसऱ्याच दिवशी धुव्वा उडवला. डावाच्या फरकाने विजय मिळवल्याने मुंबईने बोनस गुणाचीही कमाई करून (एकूण ७ गुण) ड-गटात अग्रस्थानी झेप घेतली.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुलानीमुळे मुंबई अग्रस्थानी! हिमाचल प्रदेशवर एका डावाच्या फरकाने वर्चस्व; बोनस गुणाचीही कमाई
Published on

मुंबई : मुंबईचा डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने (३७ धावांत ५ बळी) दुसऱ्या डावात प्रभावी गोलंदाजी केली. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईने हिमाचल प्रदेशचा एक डाव आणि १२० धावांच्या फरकाने तिसऱ्याच दिवशी धुव्वा उडवला. डावाच्या फरकाने विजय मिळवल्याने मुंबईने बोनस गुणाचीही कमाई करून (एकूण ७ गुण) ड-गटात अग्रस्थानी झेप घेतली.

वांद्रे-कुर्ला संकुल, बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानात झालेल्या ड-गटातील या लढतीत मुंबईने फॉलोऑन पत्करणाऱ्या हिमाचलचा दुसरा डाव सोमवारी ४९.१ षटकांत १३९ धावांत गुंडाळला. रणजी स्पर्धेत डावाच्या फरकाने किंवा १० गडी राखून विजय मिळवणाऱ्या संघाला बोनस गुणासह एकूण ७ गुण देण्यात येतात. हिमाचलकडून पुखराज मनने ६५ धावांची एकाकी झुंज दिली. मात्र २८ वर्षीय मुलानीने प्रथम श्रेणी कारकीर्दीत १९व्यांदा डावात पाच बळी मिळवण्याची किमया साधली. त्याला मुशीर खानने २ बळी मिळवत उत्तम साथ दिली. मुशीरलाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. कारण त्याने पहिल्या डावात ११२ धावांची खेळी साकारण्यासह लढतीत एकूण ३ बळी मिळवले.

तूर्तास चार साखळी लढतींनंतर मुंबईचा संघ १७ गुणांसह (२ विजय, २ अनिर्णित) ड-गटात अग्रस्थानी आहे. त्यानंतर अनुक्रमे छत्तीसड (१३), हैदराबाद (१०) यांचा क्रमांक आहे. मुंबईची आता १६ तारखेपासून बीकेसी येथेच पुद्दुचेरीशी गाठ पडणार आहे. शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने सलामीच्या लढतीत जम्मू आणि काश्मीरला नमवले. मग छत्तीसगडविरुद्ध त्यांनी पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळवले, तर राजस्थानविरुद्ध अनिर्णित लढतीत त्यांना एकाच गुणावर समाधान मानावे लागले.

दरम्यान, हिमाचलविरुद्धच्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात १३७.२ षटकांत ४४६ धावांचा डोंगर उभारला. २० वर्षीय मुशीर (१६२ चेंडूंत ११२ धावा) आणि अनुभवी सिद्धेश लाड (२६० चेंडूंत १२७ धावा) यांनी शतके झळकावली, तर मुलानीने ६९ धावांचे योगदान दिले. त्यानंतर हिमाचलचा पहिला डाव १८७ धावांत आटोपला. ऑफस्पिनर हिमांशू सिंगने ३ बळी मिळवले. मुंबईने पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी मिळवल्याने हिमाचलवर फॉलोऑन लादला.

मग सोमवारी तिसऱ्या दिवशी मुंबईने हिमाचलचा दुसरा डावही ४९.१ षटकांत १३९ धावांत झटपट गुंडाळून एक डाव आणि तब्बल १२० धावांच्या फरकाने शानदार विजय नोंदवला. त्यामुळे यंदाच्या हंगामात मुंबई पुन्हा एकदा जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे.

दरम्यान, १५ ऑक्टोबरपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी स्पर्धेच्या ९१व्या हंगामाला प्रारंभ झाला. गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येईल. या स्पर्धेचा पहिला टप्पा १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या काळात होईल. मग दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगेल. त्यानंतर २२ जानेवारीपासून रणजीचा दुसरा टप्पा सुरू होईल. २८ फेब्रुवारीला रणजी स्पर्धा संपन्न होईल.

गतवेळेस विदर्भाने केरळला नमवून तिसऱ्यांदा रणजी करंडक उंचावला होता. त्यामुळे त्यांच्यापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. स्पर्धेत यंदाही ३८ संघांचा समावेश असून त्यापैकी ३२ संघांची चार एलिट गटात (एका गटात आठ संघ), तर उरलेल्या ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्यपूर्व फेरी गाठतील.

संक्षिप्त धावफलक

  • मुंबई (पहिला डाव) : सर्व बाद ४४६

  • हिमाचल प्रदेश (पहिला डाव) : सर्व बाद १८७

  • हिमाचल प्रदेश (दुसरा डाव) : ४९.१ षटकांत सर्व बाद १३९ (पुखराज मन ६५; शम्स मुलानी ५/३७, मुशीर खान २/२३)

  • निकाल : मुंबई विजयी (७ गुण)

महाराष्ट्राने आघाडीची संधी गमावली

पुणे : गहुंजे येथे सुरू असलेल्या ब-गटातील लढतीत महाराष्ट्राने कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी गमावली. कर्नाटकच्या ३१३ धावांच्या प्रत्युत्तरात महाराष्ट्राचा पहिला डाव सोमवारी ९९.२ षटकांत ३०० धावांत संपुष्टात आल्याने ते १३ धावांनी पिछाडीवर राहिले. पृथ्वी शॉ (७१) व जलज सक्सेना (७२) यांनी झुंजार अर्धशतके झळकावली होती. दरम्यान, कर्नाटकने मग तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ५ बाद १४४ धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे आता १५७ धावांची एकूण आघाडी असून कर्णधार मयांक अगरवाल ६४ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे मंगळवारी चौथ्या दिवशी लढतीचा निकाल लागणार की कर्नाटक पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळवणार, हे पाहणे रंजक ठरेल.

विदर्भाच्या ध्रुव, अमन यांची दमदार शतके

नागपूर : ध्रुव शोरेने (१६१ चेंडूंत १०१ धावा) सलग दुसऱ्या डावात शतक साकारले. त्याला अमन मोखाडेच्या (१५२ चेंडूंत १०१ धावा) शतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे विदर्भाने अ-गटाच्या सामन्यात ओदिशाविरुद्ध दुसरा डाव ५९ षटकांत २ बाद २१८ धावांवर घोषित केला. पहिल्या डावातील १२६ धावांच्या आघाडीमुळे विदर्भाने ओदिशापुढे विजयासाठी ३४५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ओदिशाने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद ४४ धावा केल्या असून अखेरच्या दिवशी त्यांना ३०१ धावांची, तर विदर्भाला विजयासाठी १० बळींची गरज आहे.

logo
marathi.freepressjournal.in