रहाणेमुळे मुंबई उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी; विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना विदर्भावर ६ गडी राखून विजय

अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने शानदार फॉर्म कायम राखताना ४५ चेंडूंतच ८४ धावांची खेळी साकारली. त्यामुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
रहाणेमुळे मुंबई उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी; विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना विदर्भावर ६ गडी राखून विजय
एक्स
Published on

बंगळुरू : अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने शानदार फॉर्म कायम राखताना ४५ चेंडूंतच ८४ धावांची खेळी साकारली. त्यामुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. मुंबईने बुधवारी उपांत्यपूर्व लढतीत विदर्भाचा ६ गडी आणि ४ चेंडू राखून पराभव केला. विशेष म्हणजे मुंबईने या लढतीत विक्रमी धावसंख्येचा पाठलाग केला.

अलूर येथील कर्नाटक स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात विदर्भाने दिलेले २२२ धावांचे लक्ष्य मुंबईने १९.२ षटकांत गाठले. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच बाद फेरीच्या लढतीत (नॉक-आऊट) एखाद्या संघाने इतक्या धावांचा यशस्वी पाठलाग केला. यापूर्वी २०२२मध्ये हिमाचल प्रदेशने बंगालविरुद्ध २०० धावांचे लक्ष्य हासिल केले होते. मुंबईच्या विजयाचे श्रेय प्रामुख्याने रहाणेला जाते. त्यामुळे रहाणेने सलग दुसऱ्या लढतीत सामनावीर पुरस्कार पटकावला. आता मुंबईला २०२२नंतर पुन्हा एकहा ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य सामन्यात मुंबईसमोर बडोद्याचे कडवे आव्हान असेल.

मुंबई आणि विदर्भ या दोन्ही संघांनी आपापल्या गटात अग्रस्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश केला होता. त्यामुळे ही लढत रंगतदार होणार, याची चाहत्यांना खात्री होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जितेश शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाने २० षटकांत ६ बाद २२१ धावांचा डोंगर उभारला. अथर्व तायडे (४१ चेंडूंत ६६) आणि अपूर्व वानखेडे (३३ चेंडूंत ५१) यांनी धडाकेबाज अर्धशतके झळकावली. तेच शुभम दुबेने १९ चेंडूंत नाबाद ४३ धावा फटकावल्या. मुंबईकडून अथर्व अंकोलेकर व सूर्यांश शेडगे यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने धडाक्यात सुरुवात केली. २५ वर्षीय पृथ्वी शॉ आणि ३६ वर्षीय रहाणे यांनी ४२ चेंडूंतच ८३ धावांची सलामी नोंदवली. २६ चेंडूंत ४९ धावा काढून पृथ्वी माघारी परतला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर (५) व सूर्यकुमार यादव (९) स्वस्तात माघारी परतल्याने ११ षटकांनंतर मुंबईचा संघ ३ बाद ११८ अशा स्थितीत होता. मात्र गेल्या लढतीत ९५ धावा करणाऱ्या रहाणेने १० चौकार व ३ षटकारांसह या हंगामातील चौथे अर्धशतक साकारले. १६व्या षटकात यश ठाकूरने रहाणेचा अडसर दूर केला, तेव्हा मुंबईला २९ चेंडूंत ६५ धावांची गरज होती.

तेथून मग डावखुरा शिवम दुबे आणि २१ वर्षीय सूर्यांश यांनी मोर्चा सांभाळला. विशेषत: सूर्यांशने १७व्या षटकात मंदार महालेवर हल्लाबोल करताना ३ षटकारांसह २४ धावा लुटल्या. त्यानंतर दुबेने १८व्या षटकात दोन षटकार लगावले. अखेर ६ चेंडूंत ६ धावा असे समीकरण आल्यावर सूर्यांशने पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली व पुढील चेंडूवर षटकार लगावून थाटात मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सूर्यांशने १२ चेंडूंत नाबाद ३६, तर शिवमने २२ चेंडूंत नाबाद ३७ धावा फटकावल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची भर घातली. त्यामुळे मुंबईने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.

संक्षिप्त धावफलक

विदर्भ : २० षटकांत ६ बाद २२१ (अथर्व तायडे ६६, अपूर्व वानखेडे ५१, शुभम दुबे नाबाद ४३; अथर्व अंकोलेकर २/३२) पराभूत वि.

मुंबई : १९.२ षटकांत ४ बाद २२४ (अजिंक्य रहाणे ८४, पृथ्वी शॉ ४९, शिवम दुबे नाबाद ३७, सूर्यांश शेडगे नाबाद ३६)

सामनावीर : अजिंक्य रहाणे

रहाणेने या स्पर्धेतील ७ सामन्यांत ४ अर्धशतकांसह तब्बल ३३४ धावा केल्या आहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आता तो अग्रस्थानी आहे. रहाणेच्या पुढे असलेले सकिबूल घणी (बिहार), करण लाल (बंगाल), अभिषेक पोरेल (बंगाल) या तिघांचे संघ स्पर्धेबाहेर गेले आहेत.

मुंबईने सलग दुसऱ्या सामन्यात २२०हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. यापूर्वी साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत त्यांनी आंध्र प्रदेशचे २३० धावांचे लक्ष्य गाठले होते. त्यामुळे मुंबईला कमी लेखणे अन्य संघांना जोखमीचे ठरू शकते.

उपांत्य फेरीचे सामने

मुंबई वि. बडोदा

(सकाळी ११ वाजल्यापासून)

मध्य प्रदेश वि. दिल्ली

(दुपारी ४.३० वाजल्यापासून)

थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

logo
marathi.freepressjournal.in