पहिल्या दोन सामन्यांसाठी रोहितचा मुंबई संघात समावेश; श्रेयस, रहाणे दुखापतीमुळे विजय हजारे स्पर्धेला तूर्तास मुकणार

बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे.
पहिल्या दोन सामन्यांसाठी रोहितचा मुंबई संघात समावेश; श्रेयस, रहाणे दुखापतीमुळे विजय हजारे स्पर्धेला तूर्तास मुकणार
Published on

मुंबई : भारताचा तारांकित फलंदाज रोहित शर्माचा पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे. विजय हजारे करंडक या देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात जायबंदी श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे यांना स्थान लाभलेले नाही.

२४ डिसेंबरपासून देशातील विविध शहरांज विजय हजारे स्पर्धेला प्रारंभ होईल. १८ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत रणजीप्रमाणेच ३८ संघ सहभागी झाले आहेत. त्यांपैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उर्वरित ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. मुंबई क-गटात असून २४ तारखेला सिक्कीमविरुद्धच्या लढतीने ते आपल्या अभियानास प्रारंभ करतील. मुंबईचा संघ सर्व साखळी सामने जयपूरला खेळणार आहे.

बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे.

सिक्कीम, उत्तराखंडविरुद्ध खेळणार रोहित

३८ वर्षीय रोहित सध्या कसोटी व टी-२० प्रकारांतून निवृत्त झालेला असून फक्त एकदिवसीय प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तो सिक्कीम आणि उत्तराखंड या संघांविरुद्ध पहिले दोन साखळी सामने खेळणार आहे. ११ जानेवारीपासून भारताची न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी रोहित या स्पर्धेत खेळून लय टिकवणार आहे.

युवा खेळाडूंना संधी

दरम्यान, मुंबईच्या संघात प्रामुख्याने युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. श्रेयस बरगड्यांच्या दुखापतीतून सावरत आहे, तर रहाणेला स्नायूंची दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याने स्वत:हूनच काही सामन्यांसाठी विश्रांती मागितली आहे. डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालचासुद्धा मुंबईच्या संघात समावेश नाही. राजस्थानविरुद्ध मुश्ताक अली स्पर्धेतील लढतीत यशस्वीला पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे तोदेखील तूर्तास संघाचा भाग नाही.

पहिल्या दोन लढतींनंतर संघात गरज वाटल्यास त्याचा समावेश केला जाईल. शार्दूल ठाकूर मुंबईचे नेतृत्व करणार असून आयपीएलमध्ये हैदराबाद संघाकडून बोली लागलेला ओमकार तरमळे, इशान मुलचंदानी, चिन्मय सुतार या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

मुंबईचा संघ

शार्दूल ठाकूर (कर्णधार), रोहित शर्मा, इशान मुलचंदानी, मुशीर खान, अंक्रिश रघुवंशी, सर्फराझ खान, सिद्धेश लाड, चिन्मय सुतार, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, ओमकार तरमळे, सेल्व्हिस्टर डीसोझा, साईराज पाटील, सूर्यांश शेडगे.

logo
marathi.freepressjournal.in