
मुंबई : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून मुंबईत कुर्ला येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभला बुधवारी कुर्ला येथे जल्लोषात सुरुवात झाली आहे.
कोणत्या खेळांचा थरार?
मल्लखांब, लेझिम, लगोरी, विटी-दांडू , पंजा लढवणे, रस्सीखेच, पावनखिंड दौड, कुस्ती यांसारख्या अनेक पारंपारिक देशी खेळांचा थरार येथे पाहायला मिळणार आहे. १३ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान मुंबईकरांना हे पारंपरिक खेळ पाहायला मिळतील.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपली संस्कृती आणि परंपरा जागृत ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. कुर्ला येथील जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मैदान केवळ देशी आणि पारंपरिक खेळांसाठी राखीव करण्यात आले आहे. या मैदानाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांचे मैदान असे नामकरण आणि लोकार्पण यावेळी केले जाणार आहे. क्रीडा भारती या संस्थेच्या माध्यमातून १५ हजारांहून जास्त स्पर्धकांनी विविध खेळांसाठी नोंदणी केली आहे.