प्रतिष्ठा राखण्यासाठी मुंबईची लढाई! वानखेडे स्टेडियमवर आज कोलकाताशी गाठ; टी-२० विश्वचषकापूर्वी लय मिळवण्याचे खेळाडूंचे ध्येय

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचे यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) आव्हान फक्त जर-तरवर टिकून आहे.
प्रतिष्ठा राखण्यासाठी मुंबईची लढाई! वानखेडे स्टेडियमवर आज कोलकाताशी गाठ; टी-२० विश्वचषकापूर्वी लय मिळवण्याचे खेळाडूंचे ध्येय

मुंबई : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचे यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) आव्हान फक्त जर-तरवर टिकून आहे. त्यामुळे आता किमान प्रतिष्ठा राखण्याच्या निर्धाराने मुंबईचे खेळाडू मैदानात उतरतील. शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबईची जबरदस्त लयीत असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ पडणार आहे. आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी पुरेसा सराव करून घेण्याचेही दोन्ही संघांतील खेळाडूंचे ध्येय असेल.

मुंबईचा संघ १० सामन्यांतील फक्त ३ विजयांच्या ६ गुणांसह तूर्तास गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. उर्वरित चारही लढती जिंकल्या तरी मुंबईला धावगती तसेच अन्य संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. मुंबईच्या संघातील चार खेळाडूंचा टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यादृष्टीने खेळाडूंची तंदुरुस्ती व कामाच्या ताणाचे व्यवस्थापन (वर्क लोड मॅनेजमेंट) करण्याकडे मुंबईचे लक्ष्य असेल. वानखेडेवर यंदाच्या हंगामातील चारपैकी दोन सामन्यांत मुंबईने विजय मिळवला आहे. येथे धावांचा पाठलाग करणे नेहमीच सोपे ठरले असल्याने २०० धावाही विजयासाठी पुरेशा नसतील.

दुसरीकडे मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताने या हंगामात ९ पैकी ६ लढती जिंकून १२ गुणांसह दुसरे स्थान टिकवले आहे. कोलकाताने गेल्या लढतीत दिल्लीली सहज धूळ चारली. कोलकाताने उर्वरित पाचपैकी किमान २ अथवा ३ लढती जिंकल्या, तरी त्यांचे अव्वल २ संघातील स्थान पक्के होऊ शकते. मात्र मुंबईविरुद्ध कोलकाताची कामगिरी तसेच आकडेवारी सुमार आहे. त्यामुळे ते यंदा कामगिरीत सुधारणा करतील, अशी अपेक्षा आहे. कोलकाताने गेल्या १२ वर्षांत म्हणजेच २०१२ नंतर वानखेडेवर एकही लढत जिंकलेली नाही. येथे दवाचा घटक निर्णायक भूमिका बजावत असल्याने कोलकाताच्या गोलंदाजांचा पुन्हा कस लागू शकतो.

मुंबईकर श्रेयस आणि रिंकूवर लक्ष

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या श्रेयसकडून वानखेडेवर कोलकाताच्या चाहत्यांना मोठी खेळी अपेक्षित असेल. त्याशिवाय टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या मुख्य संघात स्थान न मिळवू शकलेल्या रिंकू सिंगला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळणार का, हे पाहावे लागेल. कोलकाताची सलामी जोडी फिल सॉल्ट व सुनील नरिन भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे वानखेडेच्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर ते हंगामा करू शकतात. त्याशिवाय आंद्रे रसेलही फटकेबाजी करण्यात पटाईत आहे. गोलंदाजीत मात्र कोलकाताला मिचेल स्टार्ककडून सातत्य अपेक्षित आहे. तसेच फिरकीपटू वरुण चक्रवर्ती त्यांच्यासाठी हुकमी एक्का ठरेल. हर्षित राणावर एका सामन्याची बंदी असल्याने तो या लढतीत खेळू शकणार नाही. वैभव अरोराने मात्र आतापर्यंत चमक दाखवलेली आहे.

हार्दिक, रोहितकडून सुधारणा अपेक्षित

हार्दिक व रोहित शर्मा या आजी-माजी कर्णधारांनी गेल्या काही सामन्यांत सातत्याने निराश केले आहे. विशेषत: रोहित सलग तीन सामन्यांत एकेरी धावसंख्येतच बाद झाला. तर हार्दिक लखनऊविरुद्ध शून्यावरच माघारी परतला. तिलक वर्माने या हंगामात मुंबईसाठी आतापर्यंत सर्वाधिक ३४३ धावा केल्या आहेत. मात्र इशान किशनचे अपयश मुंबईला महागात पडत आहे. सूर्यकुमार यादवही दुसऱ्या डावात निराशा करत आहे. त्या तुलनेत टिम डेव्हिडने यंदा फलंदाजीत बऱ्यापैकी योगदान दिले आहे. गोलंदाजीत पुन्हा एकदा तारांकित जसप्रीत बुमरा (१४ बळी), जेराल्ड कोएट्झे व श्रीलंकेचा नुवान थुशारा या वेगवान त्रिकुटावर मुंबईची भिस्त असेल. फिरकीपटू पियूष चावला व मोहम्मद नबी यांचा मुंबईने गोलंदाजीत योग्य वापर केलेला नाही. एकूणच सांघिक कामगिरीत मुंबईचा संघ अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, पियूष चावला, शम्स मुलाणी, जसप्रीत बुमरा, जेराल्ड कोएट्झे, ल्यूक वूड, श्रेयस गोपाळ, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, क्वेना माफका, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुशारा, नेहल वधेरा, हार्विक देसाई.

कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव अरोरा, मिचेल स्टार्क, श्रीकर भरत, दुश्मंता चमीरा, हर्षित राणा, वेंकटेश अय्यर, मुजीब उर रहमान, सुनील नरिन, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रहमनुल्ला गुरबाझ, रमणदीप सिंग, नितीश राणा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, शर्फेन रुदरफोर्ड, चेतन साकरिया, सकिब हुसैन, फिल सॉल्ट, रिंकू सिंग, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in