मुंबईचा आसामवर डावाने विजय

पहिल्या डावात अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या शार्दूल ठाकूरला शनिवारी दुसऱ्या डावातही चांगला सूर गवसला.
मुंबईचा आसामवर डावाने विजय

मुंबई : शार्दूल ठाकूरच्या ४ विकेट्समुळे मुंबईने आसामचा दुसरा डाव १०८ धावांवर गारद करत एक डाव आणि ८० धावांनी विजय मिळवला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने दोन दिवस शिल्लक राखून आसामला पराभवाची धूळ चारली.

पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ४ बळी मिळवणारा शार्दूल ठाकूर मुंबईच्या विजयाचा आणि सामनावीराचा मानकरी ठरला. शिवम दुबेच्या नाबाद १२१ धावांच्या खेळीमुळे मुंबईने पहिल्या डावात २७२ धावा करत पहिल्या डावात १८८ धावांची आघाडी घेतली. शिवमने शम्स मुलानी याच्यासह सहाव्या विकेटसाठी १०३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दुबेने १४० चेंडूंत ११ चौकार आणि ५ षटकारासह नाबाद १२१ धावा फटकावल्या. त्याला मुलानीने ३१ धावा करत चांगली साथ दिली.

पहिल्या डावात अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या शार्दूल ठाकूरला शनिवारी दुसऱ्या डावातही चांगला सूर गवसला. सामन्याचे दोन दिवश शिल्लक असल्यामुळे आसामला मोठ्या भागीदाऱ्या रचण्याची संधी होती. मात्र त्यांचा डाव चहापानाआधीच संपुष्टात आला. शार्दूलने मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे यांच्या साथीने आसामच्या फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. त्यामुळे आसामला दुसऱ्या डावात फक्त १०८ धावाच करता आल्या. मुंबईकडून शार्दूलने ४, तर अवस्थी आणि देशपांडे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in