बुमराचा हादरा आणि कार्तिकचा तडाखा

बुमराने हा निर्णय योग्य ठरवताना तारांकित विराट कोहलीला अवघ्या ९ चेंडूंत ३ धावांवर बाद केले. कॅमेरून ग्रीनच्या जागी संधी लाभलेला विल जॅक्सही फक्त ८ धावांवर माघारी परतला.
बुमराचा हादरा आणि कार्तिकचा तडाखा

मुंबई : जसप्रीत बुमराने (२१ धावांत ५ बळी) केलेल्या प्रभावी गोलंदाजीनंतर दिनेश कार्तिकने २३ चेंडूंत ५३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलमध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध २० षटकांत ८ बाद १९६ अशी धावसंख्या उभारली. वानखेडे स्टेडियमवर ३० हजारहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या या लढतीत मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बुमराने हा निर्णय योग्य ठरवताना तारांकित विराट कोहलीला अवघ्या ९ चेंडूंत ३ धावांवर बाद केले. कॅमेरून ग्रीनच्या जागी संधी लाभलेला विल जॅक्सही फक्त ८ धावांवर माघारी परतला. तेथून मग कर्णधार फॅफ डू प्लेसिस व रजत पाटिदार यांची जोडी जमली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली.

पाटिदारने २६ चेंडूंतच ५०, तर डू प्लेसिसने ४० चेंडूंत ६१ धावा केल्या. जेराल्ड कोएट्झेने पाटिदार, तर बुमराने डू प्लेसिसचा अडथळा दूर केला. ग्लेन मॅक्सवेल भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर मात्र कार्तिकचे मैदानावर आगमन झाले. महिपाल लोमरोर, सौरव चौहान व विजयकुमार वैशाख यांना बाद करून बुमराने बंगळुरूचे कंबरडे मोडले. परंतु कार्तिकने ५ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी करून बंगळुरूला दोनशे धावांच्या जवळपास नेले.

जायबंदी विनोदच्या जागी हार्विक मुंबई इंडियन्सकडे

यष्टिरक्षक-फलंदाज विष्णू विनोद दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल हंगामाला मुकणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी सौराष्ट्रचा यष्टिरक्षक-फलंदाज हार्विक देसाईचा मुंबई इंडियन्स संघात समावेश करण्यात आला आहे. २४ वर्षीय हार्विक हा २०१८मध्ये युवा विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. ३० वर्षीय विष्णूला सरावादरम्यान डाव्या हाताला दुखापत झाली असून त्याला सावरण्यासाठी महिनाभराचा अवधी लागू शकतो. त्यामुळे हार्विकची निवड करण्यात आली आहे. विष्णू २०२३च्या आयपीएलमध्ये मुंबईकडून तीन सामने खेळला होता.

आयपीएल गुणतालिका

संघ - सामने - जय - पराजय - गुण - धावगती

  • राजस्थान - ५ - ४ - १ - ८ - ०.८७१

  • कोलकाता - ४ - ३ - १ - ६ - १.५२८

  • लखनऊ - ४ - ३ - १ - ६ - ०.७७५

  • चेन्नई - ५ - ४ - २ - ६ - ०.६६६

  • हैदराबाद - ५ - ३ - २ - ६ - ०.३४४

  • गुजरात - ६ - ३ - ३ - ६ - -०.६३७

  • पंजाब - ५ - २ - ३ - ४ - -०.१९६

  • मुंबई -४ - १ - ३ - २ --०.७०४

  • बंगळुरू - ५ - १ - ४ - २ - -०.८४३

  • दिल्ली - ५ - १ - ४ - २ --१.३७०

(गुजरात वि. राजस्थान सामन्यापर्यंत)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in