अनंतपूर : डावखुरा फिरकीपटू शम्स मुलाणी (११७ धावांत ३ बळी) आणि ऑफस्पिनर तनुष कोटियन (७३ धावांत ४ बळी) यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारत-अ संघाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांनी भारत-ड संघाचा तब्बल १८६ धावांनी धुव्वा उडवला.
भारत-अ संघाने दिलेल्या ४८८ धावांचा पाठलाग करताना भारत-ड संघाचा दुसरा डाव ८२.२ षटकांत ३०१ धावांत आटोपला. रिकी भुईने ११३ धावांची झुंजार खेळी साकारली. मात्र कर्णधार श्रेयस अय्यर (४१), संजू सॅमसन (४०), यश दुबे (३७) यांना मोठी खेळी साकारता न आल्याने भारत-ड संघावर सलग दुसऱ्या पराभवाची नामुष्की ओढवली. शम्सने श्रेयस, देवदत्त पडिक्कल (१), सॅमसन असे महत्त्वाचे बळी मिळवले. तसेच पहिल्या डावात त्याने ८९ धावांची खेळीही साकारली होती. त्यामुळे शम्सला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
उभय संघांतील या लढतीत भारत-अ संघाने पहिल्या डावात २९० धावा केल्या. मग भारत-ड संघ १८३ धावांत गारद झाला. त्यानंतर प्रथम सिंग (१२२) व तिलक वर्मा (११११) यांच्या शतकामुळे भारत-अ संघाने ३ बाद ३८० धावांचा डोंगर उभारून दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे भारत-ड संघापुढे ४८८ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. मात्र रिकीवगळता कोणीही संघर्ष करू शकला नाही. भारत-अ संघ ६ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या, तर भारत-ड शून्य गुणासह चौथ्या स्थानी आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे भारताचे असंख्य तारे या स्पर्धेत खेळताना दिसत आहे. यानंतर मुश्ताकी अली व रणजी स्पर्धेतही भारताचे अनुभवी खेळाडू सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या स्पर्धेतील चुरस वाढणार आहे.
भारत-क संघाला आघाडीचे ३ गुण
मध्यमगती गोलंदाज अंशुल कंबोजने तब्बल ८ गडी मिळवले. त्यामुळे भारत-क संघाने दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या साखळी सामन्यात भारत-ब संघाविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे ३ गुण मिळवले. भारत-क संघाने पहिल्या डावात ५२५ धावा केल्यावर भारत-ब संघाला ३३२ धावांत रोखले. अभिमन्यू ईश्वरनने नाबाद १५७ धावांची झुंजार खेळी साकारली. मग दुसऱ्या डावात भारत-क संघाने ४ बाद १२८ धावा केल्या, तेव्हा पंचांनी चौथ्या दिवसाचा खेळ संपल्याचे जाहीर केले. २ सामन्यांतील १ विजय व १ बरोबरीच्या ९ गुणांसह भारत-क संघ गुणतालिकेत अग्रस्थानी आहे.