भारताच्या विजयात मुंबईकर चमकले!भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका

या विजयासह भारताने तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली असून मालिकेतील तिसरा सामना १७ जानेवारीला बंगळुरूला खेळवण्यात येईल.
भारताच्या विजयात मुंबईकर चमकले!भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका

इंदूर : सलामीवीर यशस्वी जैस्वाल (३४ चेंडूंत ६८ धावा) आणि डावखुरा शिवम दुबे (३२ चेंडूंत नाबाद ६३ धावा) या मुंबईकरांनी रविवारी भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. इंदूर येथील होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ६ गडी व २६ चेंडू राखून धुव्वा उडवला.

या विजयासह भारताने तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली असून मालिकेतील तिसरा सामना १७ जानेवारीला बंगळुरूला खेळवण्यात येईल. कर्णधार रोहित शर्माच्या कारकीर्दीतील हा १५०वा सामना होता. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वाधिक १२ टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रमही केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने १७ पैकी ११ मालिका जिंकल्या होत्या. अक्षर पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात दोन बळी मिळवले व २४ चेंडूंत ६ पेक्षाही कमीच्या सरासरीने धावा दिल्या.

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा डाव २० षटकांत १७२ धावांत संपुष्टात आला. गुलाबदीन नईबने ३५ चेंडूंत ५७ धावांची खेळी साकारली. डावखुरा फिरकीपटू अक्षरने पुन्हा एकदा टिच्चून मारा करताना १७ धावांत २ बळी मिळवले. त्यानेच नईब व कर्णधार इब्राहिम झादरान (८) यांना बाद केले. अर्शदीप सिंगने तीन, तर रवी बिश्नोईने दोन गडी बाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. मात्र यशस्वीने पहिल्याच चेंडूपासून आक्रमण केले. विराट कोहली १६ चेंडूंत २९ धावांवर माघारी परतल्यावर यशस्वी व शिवमने तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचली. यशस्वीने ५ चौकार व ६ षटकारांसह कारकीर्दीतील चौथे, तर शिवमने ५ चौकार व ४ षटकारांसह सलग दुसरे अर्धशतक झळकावले. त्यामुळे भारताने १५.४ षटकांतच विजयी रेषा गाठली.

संक्षिप्त धावफलक

अफगाणिस्तान : २० षटकांत सर्व बाद १७२ (गुलाबदीन नईब ५७, नजीबुल्ला झादरान २३; अर्शदीप सिंग ३/३२, अक्षर पटेल २/१७) पराभूत वि.

भारत : १५.४ षटकांत ४ बाद १७३ (यशस्वी जैस्वाल ६८, शिवम दुबे नाबाद ६३; करिम जनत २/१३)

सामनावीर : अक्षर पटेल

यशस्वी व शिवम यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचली. तसेच यशस्वीने कारकीर्दीतील चौथे, तर शिवमने तिसरे अर्धशतक साकारले.

भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक टी-२० सामने जिंकणाऱ्यांच्या यादीत रोहितने महेंद्रसिंह धोनीची बरोबरी साधली. धोनीने ७२ सामन्यांत ४१ सामने जिंकले होते. रोहितने मात्र ५३ लढतींमध्येच त्याची बरोबरी साधली आहे.

logo
marathi.freepressjournal.in