रणजीच्या अंतिम फेरीतील मुंबईचे स्थान जवळपास पक्के

उत्तर प्रदेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पहिल्या डावात तब्बल २१३ धावांची आघाडी मिळवली
रणजीच्या अंतिम फेरीतील मुंबईचे स्थान जवळपास पक्के
Published on

तुषार देशपांडे (३/३४), मोहित अवस्थी (३/३९) यांची वेगवान जोडी आणि फिरकीपटू तनुष कोटियनने (३/३५) केलेल्या प्रभावी माऱ्याच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उत्तर प्रदेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पहिल्या डावात तब्बल २१३ धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर १ बाद १३३ अशी मजल मारून मुंबईने एकूण ३४६ धावांपर्यंत आघाडी वाढवून अंतिम फेरीतील स्थान जवळपास पक्के केले आहे.

बंगळुरू येथील जस्ट क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावातील शतकवीर यशस्वी जैस्वाल ३५, तर अरमान जाफर ३२ धावांवर खेळत आहे. कर्णधार पृथ्वी शॉ ६४ धावांची धडाकेबाज खेळी साकारून बाद झाला. मुंबई चौथ्या दिवशी कितपत डाव लांबवते, हे पाहणे आता रंजक ठरेल.

तत्पूर्वी, बुधवारच्या २ बाद २५ धावांवरून पुढे खेळताना उत्तर प्रदेशचा पहिला डाव ५४.३ षटकांत अवघ्या १८० धावांत संपुष्टात आला. मोहितने कर्णधार करण शर्मा (२७), ध्रुव जुरेल (२) यांचे बळी मिळवले. तर तुषार देशपांडेने प्रियम गर्गला (३) जाळ्यात अडकवले. फिरकीपटू तनुषने माधव कौशिक (३८) आणि शिवम मावी (४८) यांचा प्रतिकार मोडीत काढला. त्यामुळे मुंबईला मोठी आघाडी मिळाली. मुंबईने पहिल्या डावात यशस्वी (१००) आणि हार्दिक तामोरे (११५) यांच्या शतकांच्या बळावर ३९३ अशी धावसंख्या उभारली.

logo
marathi.freepressjournal.in