मुलाणीमुळे मुंबईचा सलग तिसरा विजय: केरळचा तब्बल २३२ धावांनी धुव्वा; मोहितला सामनावीर पुरस्कार

पहिल्या डावात ७ बळी घेणारा मध्यमगती गोलंदाज मोहित अवस्थी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
मुलाणीमुळे मुंबईचा सलग तिसरा विजय: केरळचा तब्बल २३२ धावांनी धुव्वा; मोहितला सामनावीर पुरस्कार

थुंबा : डावखुरा फिरकीपटू शम्स मुलाणीने (४४ धावांत ५ बळी) पुन्हा एकदा केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विजयाची हॅट्‌ट्रिक साकारली. ब-गटातील साखळी सामन्यात त्यांनी केरळचा २३२ धावांनी फडशा पाडून अग्रस्थान टिकवले. पहिल्या डावात ७ बळी घेणारा मध्यमगती गोलंदाज मोहित अवस्थी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने फलंदाजीतही दोन्ही डावांत मिळून ४८ धावांचे योगदान दिले.

केरळमधील सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या लढतीतील अखेरच्या दिवशी केरळला विजयासाठी आणखी ३०३ धावांची गरज होती. रविवारच्या बिनबाद २४ धावांवरून पुढे खेळताना ते मुंबईला कडवी झुंज देतील, अशी अपेक्षा होती. मात्र मुलाणी व ऑफस्पिनर तनुष कोटियनपुढे केरळचा दुसरा डाव ३३ षटकांत अवघ्या ९४ धावांतच संपुष्टात आला. धवल कुलकर्णीने दिवसाच्या पहिल्याच षटकात जलज सक्सेना (१६) व त्यानंतर कृष्णा प्रसादला (४) माघारी पाठवले.

मग मुलाणीचे गोलंदाजीसाठी आगमन होताच केरळच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मुलाणीने रोहन कुनुम्मल (२६), रोहन प्रेम (११), सचिन बेबी (१२) यांसारखे महत्त्वाचे बळी मिळवले. कर्णधार संजू सॅमसन १५ धावांवर नाबाद राहिला. मुंबईने यापूर्वीच्या दोन सामन्यांत अनुक्रमे बिहार व आंध्र प्रदेशचा अक्षरश: धुव्वा उडवताना बोनस गुणासह विजय मिळवला होता. एका डावाने अथवा १० गडी राखून विजय मिळवल्यास बोनस गुण म्हणजेच एकंदर सात गुण देण्यात येतात. तीन सामन्यांतील २० गुणांसह ब-गटात अग्रस्थानी असणाऱ्या मुंबईचा पुढील सामना २६ जानेवारीपासून उत्तर प्रदेशशी होणार आहे. ही लढत वानखेडे स्टेडियमवर होईल.

महाराष्ट्राचा राजस्थानकडून दारुण पराभव

फलंदाजांनी दोन्ही डावांत केलेल्या सुमार कामगिरीमुळे केदार जाधवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्राला अ-गटात राजस्थानकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्र दुसऱ्या डावात १८४ धावांत गारद झाल्यानंतर राजस्थानने १०४ धावांचे लक्ष्य एकही फलंदाज न गमावता गाठले. गटात तिसऱ्या स्थानी असलेल्या महाराष्ट्राची २६ जारखेपासून हरयाणाशी गाठ पडेल. फलंदाजांनी दोन्ही डावांत केलेल्या सुमार कामगिरीमुळे केदार जाधवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्राला अ-गटात राजस्थानकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्र दुसऱ्या डावात १८४ धावांत गारद झाल्यानंतर राजस्थानने १०४ धावांचे लक्ष्य एकही फलंदाज न गमावता गाठले. गटात तिसऱ्या स्थानी असलेल्या महाराष्ट्राची २६ जारखेपासून हरयाणाशी गाठ पडेल.

logo
marathi.freepressjournal.in