

ग्लासगो : ॲथलेटिक्समधील लांब उडी प्रकारात भारताच्या दोन्ही क्रीडापटूंनी शानदार कामगिरी नोंदवली. मुरली श्रीशंकर व लोकेश सत्यनाथन यांनी पात्रता फेरीतील यशाद्वारे अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. आता २९ जुलै रोजी दोघेही अंतिम फेरीत पदकासाठी दावेदारी पेश करतील.
२०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या २७ वर्षीय मुरलीने एकाच उडीत थेट पात्रतेचा निकष पार केला. अ-गट पात्रता फेरीत श्रीशंकरने ८.०१ मीटरची उडी मारून थेट अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत थेट पात्रतेसाठी ८ मीटरची उडी किंवा किमान अव्वल १२ कामगिरीचा निकष ठरवण्यात आला होता. या गटातून थेट पात्रता मिळवणारा तो एकमेव खेळाडू ठरला, तर इतर पाच खेळाडूंनी अव्वल १२ मधील कामगिरीच्या आधारे अंतिम फेरीत प्रवेश केला. या मोसमात ८.३८ मीटरची सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या श्रीशंकरने २०२२ मधील राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
स्पर्धेतील हवामानाबद्दल श्रीशंकर म्हणाला, “पात्रता फेरी अत्यंत आव्हानात्मक होती. सर्वांसाठीच हवामान कठीण होते. थंडी, सोसाट्याचा वारा आणि मधोमध येणारा पाऊस अशा स्थितीतही पहिल्याच प्रयत्नात थेट पात्रता मिळवता आल्याने अंतिम फेरीबद्दल कमालीची उत्सुकता आहे.”
दुसरीकडे लोकेशने अव्वल १२ खेळाडूंत स्थान मिळवून आगेकूच केली. ब-गटात खेळताना लोकेश सत्यानाथन याने ७.७७ मीटर उडी मारली. तो आपल्या गटात ७.८४ मीटर उडी मारणाऱ्या रेगन कॉरिनच्या मागे चौथ्या स्थानावर राहिला. जमैकाच्या ताजाय गेलने ८.१० मीटर आणि युरॉय रायनने ८.०४ मीटर उडी मारून थेट पात्रता मिळवली.
एप्रिल २०२४ मध्ये गुढघ्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर श्रीशंकर पुनरागमन करत आहे. या दुखापतीमुळे त्याला पॅरिस ऑलिम्पिकला मुकावे लागले होते. गेल्या महिन्यात भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती.