मुशीरचा द्विशतकी धमाका; मुंबईकडे २५७ धावांची आघाडी

भार्गव भट्ट याने सात विकेट्स मिळवत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले असले तरी मुशीर खानच्या खेळीमुळे बडोद्याला मुंबईवर वर्चस्व मिळवता आले नाही.
मुशीरचा द्विशतकी धमाका; मुंबईकडे २५७ धावांची आघाडी

मुंबई : एकीकडे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत सर्फराझ खान चमक दाखवत असतानाच, त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान याने मुंबईकडून खेळताना प्रथमच द्विशतकी खेळी साकारली. त्याच्या नाबाद २०३ धावांच्या खेळीमुळे मुंबईने पहिल्या डावात ३८४ धावा केल्या. बडोद्यानेही प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या दिवसअखेर २ बाद १२७ धावा केल्या असल्या तरी मुंबईकडे २५७ धावांची आघाडी आहे.

भार्गव भट्ट याने सात विकेट्स मिळवत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले असले तरी मुशीर खानच्या खेळीमुळे बडोद्याला मुंबईवर वर्चस्व मिळवता आले नाही. त्याच्या नाबाद द्विशतकामुळे मुंबईने पहिल्या डावात साडेतीनशे धावांचा टप्पा पार केला. मुंबईच्या धावसंख्येला उत्तर देताना शार्दूल ठाकूरने दुसऱ्याच षटकांत बडोद्याला धक्का देत प्रियांशू मोलिया (१) याला त्रिफळाचीत केले. त्यानंतर शम्स मुलानीने ज्योत्सनील सिंग (३२) याला भूपेन ललवानीकरवी झेलबाद करत बडोद्याला दुसरा धक्का दिला.

बडोद्याची २ बाद ६५ अशी स्थिती असताना शाश्वत रावत आणि कर्णधार विष्णू सोलंकी त्यांच्या मदतीला धावून आले. या दोघांनी कोणतीही पडझड होऊ न देता तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ६२ धावांची भागीदारी रचली. शाश्वत ९ चौकारांसह ६९ धावांवर तर विष्णू २ चौकारांसह २३ धावांवर खेळत आहे.

रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील शनिवारचा दिवस गाजवला तो मुशीर खानने. आपल्या पहिल्याच शतकी खेळीचे द्विशतकी खेळीत रूपांतर करताना मुशीरने मुंबईला सुस्थितीत आणून ठेवले. मुशीरने ३५७ चेंडूंत १८ चौकारांच्या साहाय्याने नाबाद २०३ धावांची खेळी साकारली. मुंबईचा संघ ४ बाद ९९ अशा बिकट स्थितीत असताना त्याने ४१वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबईला जवळपास ४०० धावांच्या आसपास पोहोचवले. १८ वर्षीय मुशीरने पाचव्या विकेटसाठी यष्टीरक्षक-फलंदाज हार्दिक तामोरे याच्यासह महत्त्वपूर्ण १८१ धावांची भागीदारी रचली. तामोरे यानेही ५७ धावा फटकावत त्याला चांगली साथ दिली. भार्गव भट्टने मुंबईच्या सात फलंदाजांना माघारी पाठवले तर निनाद राठवा याने तीन विकेट्स मिळवत त्याला चांगली साथ दिली.

logo
marathi.freepressjournal.in