मुश्ताक अली टी-२० स्पर्धा : अजिंक्यमुळे मुंबईचा विजयारंभ

अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने (३३ चेंडूंत ६२ धावा) साकारलेल्या दमदार अर्धशतकाच्या बळावर गतविजेत्या मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेचा विजयारंभ केला. मुंबईने बुधवारी अ-गटातील सलामीच्या लढतीत रेल्वेला ७ गडी व २५ चेंडू राखून धूळ चारली.
मुश्ताक अली टी-२० स्पर्धा : अजिंक्यमुळे मुंबईचा विजयारंभ
मुश्ताक अली टी-२० स्पर्धा : अजिंक्यमुळे मुंबईचा विजयारंभPhoto Credit: MURALI KUMAR K
Published on

लखनऊ : अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने (३३ चेंडूंत ६२ धावा) साकारलेल्या दमदार अर्धशतकाच्या बळावर गतविजेत्या मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेचा विजयारंभ केला. मुंबईने बुधवारी अ-गटातील सलामीच्या लढतीत रेल्वेला ७ गडी व २५ चेंडू राखून धूळ चारली.

२६ नोव्हेंबरपासून देशातील विविध शहरांत मुश्ताक अली ही देशांतर्गत टी-२० स्पर्धा सुरू झाली. रणजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सर्व संघांचे पाच साखळी सामने झाल्यावर आता मुश्ताक अली व त्यानंतर विजय हजारे ही देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा खेळवण्यात येईल. मुंबईचा संघ हा मुश्ताक अली स्पर्धेचा गतविजेता आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईने जेतेपद मिळवले होते. मात्र यंदा श्रेयस जायबंदी असल्याने शार्दूल ठाकूर मुंबईचे नेतृत्व करत आहे.

रणजीप्रमाणेच या स्पर्धेतही ३८ संघांचा समावेश असून त्यांपैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उरलेल्या सहा संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. अ-गटात मुंबईसह केरळ, छत्तीसगड, विदर्भ, आंध्र प्रदेश, रेल्वे, ओदिशा, आसाम अशा एकूण आठ संघांचा समावेश आहे. मुंबईपुढे यंदा जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

दरम्यान, भारताच्या कसोटी संघातील स्थान गमावलेल्या ३७ वर्षीय रहाणेने गेल्या वर्षी मुश्ताक अली स्पर्धेत सर्वाधिक ४६९ धावा फटकावून मुंबईला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. यंदाही त्याने हाच फॉर्म कायम राखला आहे. प्रथम फलंदाजी करताना रेल्वेने २० षटकांत ५ बाद १५८ धावा केल्या. आशुतोष शर्माने ३० चेंडूंत ६१ धावा फटकावल्या.

मग रहाणेने आयुष म्हात्रेच्या (१८) साथीने ३५ चेंडूंत ६२ धावांची सलामी नोंदवली. तर दुसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसह ५१ धावांची भर घातली. रहाणेने ४ चौकार व ५ षटकार लगावले. तर सूर्याने ५ चौकार व २ षटकारांसह ३० चेंडूंत ४७ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर हार्दिक तामोरे (नाबाद २३) व शिवम दुबे (नाबाद ५) यांनी १५.५ षटकांत मुंबईचा विजय साकारला. याबरोबरच मुंबईने अ-गटात अग्रस्थान मिळवले. आता त्यांची शुक्रवारी विदर्भाशी गाठ पडेल.

logo
marathi.freepressjournal.in