

लखनौ : २८ वर्षीय प्रतिभावान फलंदाज सर्फराझ खानने (४७ चेंडूंत नाबाद १०० धावा) मंगळवारी टी-२० कारकीर्दीतील पहिले शतक साकारले. त्यामुळे मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आसामचा ९८ धावांनी धुव्वा उडवला. सलग चौथ्या विजयासह मुंबईने अ-गटातील अग्रस्थान भक्कम केले. कर्णधार शार्दूल ठाकूरने (२३ धावांत ५ बळी) गोलंदाजीत छाप पाडली.
लखनौच्या इकाना स्टेडियमवर झालेल्या अ-गटातील या लढतीत मुंबईने दिलेल्या २२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आसामचा संघ १९.१ षटकांत १२२ धावांत गारद झाला. शार्दूलने पाच, तर साईराज पाटील व अर्थव अंकोलेकर यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. शुभांकर रॉयने आसामकडून ४१ धावांची झुंज दिली. मुंबईचे सध्या ४ सामन्यांत ८ गुण असून त्यांची गुरुवारी केरळशी गाठ पडेल.
दरम्यान, २६ नोव्हेंबरपासून देशातील विविध शहरांत मुश्ताक अली ही देशांतर्गत टी-२० स्पर्धा सुरू झाली. रणजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सर्व संघांचे पाच साखळी सामने झाल्यावर आता मुश्ताक अली व त्यानंतर विजय हजारे ही देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा खेळवण्यात येईल. मुंबईचा संघ हा मुश्ताक अली स्पर्धेचा गतविजेता आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईने जेतेपद मिळवले होते. मात्र यंदा श्रेयस जायबंदी असल्याने शार्दूल मुंबईचे नेतृत्व करत आहे.
रणजीप्रमाणेच या स्पर्धेतही ३८ संघांचा समावेश असून त्यांपैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उरलेल्या सहा संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. अ-गटात मुंबईसह केरळ, छत्तीसगड, विदर्भ, आंध्र प्रदेश, रेल्वे, ओदिशा, आसाम अशा एकूण आठ संघांचा समावेश आहे. मुंबईपुढे यंदा जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. पहिल्या लढतीत मुंबईने रेल्वेवर मात केली, मग दुसऱ्या सामन्यात विदर्भाचा धुव्वा उडवला. तिसऱ्या सामन्यात आयुष म्हात्रेच्या शतकाच्या बळावर मुंबईने आंध्र प्रदेशलाही धूळ चारली.
मंगळवारी झालेल्या चौथ्या साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ४ बाद २२० धावांचा डोंगर उभारला. आयुष (२१) व अजिंक्य रहाणे (३३ चेंडूंत ४२) यांनी चांगली सुरुवात केली. मात्र ते मोठी खेळी साकारू शकले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावरील सर्फराझने मात्र ८ चौकार व ७ षटकारांसह अवघ्या ४७ चेंडूंत तुफानी शतक साकारले. त्याला सूर्यकुमार यादव (२०) व साईराज (नाबाद २५) यांनी उपयुक्त साथ दिली. त्यामुळे मुंबईने २०० धावांचा पल्ला गाठला. मग गोलंदाजांनी उत्तम मारा करून मुंबईला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : २० षटकांत ४ बाद २२२ (सर्फराझ खान नाबाद १००) विजयी.
आसाम : १९.१ षटकांत सर्व बाद १२२ (शार्दूल ठाकूर ५/२३)