जॅन निकोलचा तडाखा; टी-२० प्रकारात ठोकले सर्वात वेगवान शतक

नामिबियाचा २२ वर्षीय डावखुरा फलंदाज जॅन निकोल लोफ्टी-एटोनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विश्वविक्रम केला.
जॅन निकोलचा तडाखा; टी-२० प्रकारात ठोकले सर्वात वेगवान शतक

किर्तीपूर (नेपाळ) : नामिबियाचा २२ वर्षीय डावखुरा फलंदाज जॅन निकोल लोफ्टी-एटोनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विश्वविक्रम केला. त्याने ३३ चेंडूंतच शतक साकारून नेपाळच्या कुशल मल्लाचा (३४ चेंडूंत) विक्रम मोडीत काढला.

पाचव्या स्थानी फलंदाजीला येत निकोलने ३३ चेंडूंत ११ चौकार व ८ षटकारांसह तब्बल १११ धावा फटकावल्या. त्यामुळे नामिबियाने नेपाळला २० धावांनी पराभूत करून तिरंगी मालिकेत पहिला विजय नोंदवला. सप्टेंबर, २०२३मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळच्या कुशलने मोंगोलियाविरुद्ध ३४ चेंडूंत शतक झळकावले होते. त्यावेळी कुशलने भारताच्या रोहित शर्माचा (३५ चेंडू) विक्रम मोडीत काढला होता. मात्र ५ महिन्यांतच कुशलचा विक्रही मोडीत निघाला आहे. निकोलने अर्धशतक १८ चेंडूंत पूर्ण केले, मग पुढील १५ चेंडूंत त्याने शतकाची वेस ओलांडली.

निकोलने शतकादरम्यान ९२ धावा (११ चौकार, ८ षटकार) चौकार-षटकाराने वसूल केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये एखाद्या फलंदाजाने चौकार-षटकारांद्वारे इतक्या धावा लुटण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

logo
marathi.freepressjournal.in