काळानुसार बदलणे गरजेचे! इम्पॅक्ट प्लेयर नियमाला शास्त्री, अश्विन यांच्याकडून पाठिंबा

काळानुसार बदलणे गरजेचे! इम्पॅक्ट प्लेयर नियमाला शास्त्री, अश्विन यांच्याकडून पाठिंबा

आयपीएलमध्ये वापरण्यात येणाऱ्या इम्पॅक्ट प्लेयर नियमावर भारताचा कर्णधार रोहित शर्मासह अन्य काही आजी-माजी खेळाडूंनी टीका केली असली...
Published on

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये वापरण्यात येणाऱ्या इम्पॅक्ट प्लेयर नियमावर भारताचा कर्णधार रोहित शर्मासह अन्य काही आजी-माजी खेळाडूंनी टीका केली असली, तरी रोहितचा संघ-सहकारी रविचंद्रन अश्विन आणि भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या नियमाचे समर्थन केले आहे. काळानुरूप बदलणे गरजेचे आहे, असे शास्त्री म्हणाले.

“जेव्हा एखाद्या नव्या नियमाचा अवलंब केला जातो, तेव्हा काही लोकांकडून त्याला विरोध होतोच. नवा नियम कसा चुकीचा आहे हे त्यांच्याकडून दाखवले जाते. मात्र, ज्या वेळी १९०-२००ची धावसंख्या सातत्याने पाहायला मिळते, खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध होते आणि ते या संधीचे सोने करतात, तेव्हा लोक नियमाबाबत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यास सुरुवात करतात. इम्पॅक्ट प्लेयरचा नियम चांगलाच आहे. तुम्ही काळानुरूप बदलणे गरजेचे असते. अन्य खेळांमध्येही हे घडते. तुम्ही नवे नियम, बदल स्वीकारायला हवेत. या नियमामुळे सामने अधिक चुरशीचे होत आहेत,” असे मत शास्त्री यांनी अश्विनच्या ‘यूट्यूब’ चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे भारतीय खेळाडूंना अधिक संधी मिळत असल्याचे अश्विन म्हणाला. यासाठी त्याने यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलचे उदाहरण दिले. “आयपीएलच्या गेल्या हंगामात इम्पॅक्ट प्लेयरचा नियम पहिल्यांदा वापरण्यात आला होता. त्यावेळी राजस्थान रॉयल्स संघाने बहुतांश सामन्यांत जुरेलला प्रभावी खेळाडू म्हणून खेळवले होते. या संधीचा पुरेपूर वापर करताना जुरेलने सर्वांना प्रभावित केले आणि त्यानंतर त्याच्यासाठी भारतीय कसोटी संघाची दारे खुली झाली.” असे अश्विनने नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in