

नवी दिल्ली : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने गेल्या १०-१२ महिन्यांचा काळ आपल्यासाठी संघर्षाचा होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याशिवाय ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लव्हलिना बोर्गोहैननेदेखील पॅरिस ऑलिम्पिकनंतरचा काळ आव्हानात्मक ठरला असून एकवेळ आपण निवृत्तीचा देखील विचार केला होता, अशी प्रांजळ कबुली दिली.
ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व उत्साहात पार पडले. यावेळी फक्त १० खेळांचा स्पर्धेत समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले होते, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नसल्याने भारताच्या पदकसंख्येवर परिणाम होईल, असे भाकीत वर्तवले जात होते. १२२ खेळाडूंसह सहभागी झालेल्या भारताला वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग या क्रीडाप्रकारांतूनच सर्वाधिक पदकांची अपेक्षा होती. या क्रीडापटूंनी हा विश्वास सार्थ ठरवून भारताला पदकतालिकेत चौथे स्थान मिळवून दिले. भारताने १३ सुवर्ण, १७ रौप्य, ९ कांस्य अशी एकूण ३९ पदके पटकावली.
२०२१च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण व २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या नीरजकडून यावेळी राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र गेल्या काही काळापासून २८ वर्षीय नीरजला विविध दुखापतींनी भेडसावले होते. यामुळे त्याच्या मोसमाची सुरुवातही उशिरा झाली. तरीही राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने ८५.८३ मीटर भालाफेक करत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने ८९.७५ मीटर फेकीसह सुवर्णपदक पटकावले. याविषयीच नीरजने बुधवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून आपले मन मोकळे केले.
“गेल्या १० महिन्यांच्या कालावधीने अशी परीक्षा घेतली, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. भालाफेकीत काही थ्रो खूप लांब जातात आणि काही क्षण संपूर्ण प्रवासाचे वजन वाहून नेतात. अनेक दुखापतींमधून सावरणे, शरीर पुन्हा सक्षम करणे, लय शोधणे आणि मैदानात उतरण्याची घाई असताना संयम बाळगणे हे खूप कठीण होते. यावर्षी स्पर्धा खेळायला मिळेल की नाही, हे ठाऊक नसतानाही दररोज सराव करत होतो. या कठीण काळात पाठिंबा देणाऱ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार. पुनरागमनाच्या प्रत्येक टप्प्यावर सोबत असणारे फिजिओ इशान मारवाह, बालपणापासूनचे प्रशिक्षक जय चौधरी आणि प्रत्येक परिस्थितीत पाठीशी उभे राहणारे कुटुंब यांच्यामुळेच हे पुनरागमन शक्य झाले,” असे नीरज म्हणाला.
तसेच २८ वर्षीय बॉक्सर लव्हलिनानेदेखील नवी दिल्ली येथे केंद्रिय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतल्यानंतर जमलेल्या पत्रकारांना सामोरे जाताना कारकीर्दीतील कठीण काळाबाबत भाष्य केले. तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झालेल्या लव्हलिनाने प्रथमच रौप्यपदक जिंकले. २०२२च्या आशियाई स्पर्धेतदेखील तिने रौप्यपदक पटकावले होते. तर २०२१च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये लव्हलिनाने ऐतिहासिक कांस्य जिंकले होते. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मात्र तिच्या पदरी निराशा पडली होती.
“२०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत बाहेर पडावे लागल्यानंतर खेळ सुरू ठेवावा की नाही, असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले होते. मात्र, मी पुनरागमन केले आणि खेळत राहिले, हे माझ्यासाठी खूप मोठे आहे. दुखापती, आत्मविश्वासाची कमतरता आणि मानसिक संघर्षावर मात करत राष्ट्रकुल रौप्यपदक पटकावल्याने मी समाधानी आहे. सुवर्णपदक मिळाले असते, तर नक्कीच अधिक आनंद झाला असता,” असे लव्हलिना म्हणाली. संघाने मिळवलेल्या ७ सुवर्णपदकांचा आपल्याला सार्थ अभिमान असून, आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे मुख्य लक्ष्य असेल, असेही लव्हलिनाने नमूद केले.
आता सप्टेंबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंवर पुन्हा लक्ष असेल.