
बंगळुरू : नीरज चोप्रा हे नाव आता जगभरात ब्रँड झालेले आहे. याच नावाच्या जोरावर आता अवघ्या विश्वाला भालाफेकीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील आयोजनाद्वारे भारताची ताकद दाखवून देण्यासाठी नीरज सज्ज आहे. शनिवारी बंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर रंगणाऱ्या नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत भारतासह जगभरातील तारांकित भालाफेकपटू सहभागी होणार आहे. भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवरील भालाफेक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
२७ वर्षीय नीरजने ऑलिम्पिक सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावून भारताला भालाफेकमध्ये जगभरात ओळख मिळवून दिली. जागतिक स्पर्धेतही विजेतेपद काबिज करून नीरजने अवघ्या विश्वाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले. मे महिन्यात नीरजने ९० मीटर अंतरापुढे भालाफेक करून आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात रोवला. २०२५ या हंगामात नीरजने आतापर्यंत पॅरिस डायमंड लीग येथील दुसरा टप्पा आणि गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजेतेपद मिळवले. यावरूनच नीरज हे भालाफेकीत कितपत मोठे नाव आहे, याची प्रचिती आहे.
आता नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील काही तारांकित खेळाडू प्रथमच भारतात येतील. या स्पर्धेत भारताचे एकूण पाच स्पर्धक असतील. नीरजसह सचिन यादव, रोहित यादव, साहिल सिलवाल व यशवीर सिंग यांच्यावर नजरा असतील. आशियाई रौप्यपदक विजेता किशोर जेना दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होणार नाही. त्याशिवाय विदेशी खेळाडूंचा विचार करता २०१६चा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जर्मनीचा थॉमस रोहलर, केनियाचा जुलियस येगो यांच्यासह आणखी पाच खेळाडू सहभागी होतील. त्यामुळे एकंदर १२ खेळाडूंमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.
ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्सने दुखापतीमुळे ऐनवेळी या स्पर्धेतून माघार घेतली, तर पाकिस्तानचा अर्शद नदीम वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेत सहभागी झालेला नाही. नदीमने गतवर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ९० मीटरपुढे भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले होते. तर नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे या स्पर्धेला प्रायोजकत्व लाभले आहे. या स्पर्धेद्वारे नीरजचे सुद्धा एकप्रकारे भारतात पुनरागमन होईल. गतवर्षी भुवनेश्वर येथील फेडरेशन चषकाच्या निमित्ताने नीरज भारतात अखेरची स्पर्धा खेळला होता. एकंदर या स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
भारतीय ॲथलेटिक्समधील नवा अध्याय !
मी स्वप्न पाहत आहे, असेच वाटत आहे. कारण ज्यावेळी भालाफेक खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा आपल्या नावावर देशात एखादी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात येईल, याचा विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत नीरजने व्यक्त केली. “भारतीय ॲथलेटिक्समधील एका नव्या अध्यायाला याद्वारे प्रारंभ होईल. भारतातील युवा पिढीला भालाफेककडे वळण्याची किंबहुना त्यांच्या आवडत्या क्रीडा प्रकारात कारकीर्द घडवण्याची याद्वारे प्रेरणा मिळेल. युरोपियन देशांमध्ये जेव्हा आपले स्पर्धक जातात, तेव्हा तेथील आयोजन पाहून भारावून जातात. आता या स्पर्धेद्वारे आपण विदेशातील खेळाडूंना भारताची ताकद दाखवून देऊ,” असे नीरज म्हणाला.