नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचे राष्ट्रगीत एकदाही ऐकू आले नाही, याची खंत आहे. मात्र यापुढे तो क्षण पुन्हा अनुभवण्यासाठी अधिक मेहनत घेईन, अशा शब्दांत भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
२६ वर्षीय नीरजने चार वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक काबिज केले होते. त्यामुळे यंदाही नीरजकडून सुवर्णपदक अपेक्षित होते. मात्र नीरजला सुर्वण राखण्यात अपयश आले. ८९.४५ मीटरच्या भालाफेकीसह नीरजने यावेळी रौप्यपदक प्राप्त केले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटरच्या भालाफेकीसह सुवर्णपदक मिळवले. त्याने ऑलिम्पिक विक्रमही नोंदवला. मुख्य म्हणजे २०२०मध्ये नीरजने ८७.५८ मीटरच्या भालाफेकीसह सुवर्ण काबिज केले होते, मात्र यावेळी ८९.४५ मीटर भालाफेकी करूनही नीरजला रौप्यपदकच जिंकता आले. यावरूनच भालाफेकीतील वाढती स्पर्धा अधोरेखित होते.
“भारताचे प्रतिनिधित्व करताना जगभरातील ताऱ्यांशी स्पर्धा करणे स्वप्नवत आहे. देशासाठी सलग दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकल्याचा आनंद आहेच. मात्र यंदा देशाचे राष्ट्रगीत ऐकू आले नाही. पुढील वेळेस यासाठी आणखी मेहनत घेईन,” असे नीरज म्हणाला. नीरज हा भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा चौथा खेळाडू ठरला. यापूर्वी कुस्तीपटू सुशील कुमार, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू व नेमबाज मनू भाकर यांनी अशी कामगिरी केली होती.
“ग्रेनडाचा अँडरसन पीटर्स, जर्मनीचा जुलियन वेबर यांची नावे भालाफेकीत लोकप्रिय आहे. त्यांच्यावर सरशी साधून सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक जिंकणे अभिमानास्पद आहे. मात्र अंतिम फेरीत तंत्रातील चुकीचा मला फटका बसला. आता माझ्या दुखापतीवर लक्ष देऊन लवकरच शस्त्रक्रिया करणार आहे,” असेही नीरजने नमूद केले.
विनेशचे योगदान विसरू नये!
विनेश फोगटला पदक मिळाले नसले तरी तिने भारतीय कुस्तीसाठी जे केले ते चाहत्यांनी विसरू नये, अशी प्रतिक्रिया नीरजने व्यक्त केली. “विनेशला किमान रौप्यपदक मिळणे अपेक्षित आहे. मात्र तसे झाले नाही, तरी तिने या ऑलिम्पिकमध्ये केलेली कामगिरी देशाने विसरू नये. राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेत पदक मिळवण्यासह तिने अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला आहे,” असे नीरज म्हणाला.