झुरिच : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला सलग तिसऱ्या वर्षी डायमंड लीगच्या जेतेपदाने हुलकावणी दिली. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरजला ८५.०१ मीटरच्या भालाफेकीसह दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ९१.५१ मीटरवर भालाफेक करून विजेतेपद काबिज केले. त्यामुळे २०२२मध्ये डायमंड लीग जिंकणाऱ्या नीरजला त्यानंतर सलग तिसऱ्यांदा 'डायमंड' ने एकप्रकारे हुलकावणी दिली.
ॲथलेटिक्समध्ये दरवर्षी विविध टप्प्यांत डायमंड लीग खेळवली जाते. ऑगस्टमध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी रंगते. ३-४ महिन्यांत खेळवण्यात येणाऱ्या विविध टप्प्यांद्वारे खेळाडूंना गुण देण्यात येतात व त्यानुसार एखादा खेळाडू जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकतो. जागतिक स्पर्धेत पात्र ठरणारा आपसुकच ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी शर्यतीत असतो. त्यामुळे डायमंड लीगचा प्रत्येक टप्पा महत्त्वाचा असतो.
२७ वर्षीय नीरजने २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावून जगभरात भारताचा तिरंगा फडकावला. भालाफेकीला त्याने देशात ओळख मिळवून दिली. त्यानंतर नीरजने २०२२मध्ये डायमंड लीग, तर २०२३मध्ये जागतिक स्पर्धा जिंकण्याचाही पराक्रम केला. राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेतही नीरजने सहज अग्रस्थान पटकावले. मात्र २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच २०२५च्या दोहा
येथील डायमंड लीगच्या टप्यात नीरजने ९०.२३ मीटर अंतर सर करूनही दुसरा क्रमांक मिळवला होता. त्यावेळी वेबरनेच अग्रस्थान पटकावले होते.
नीरजचा दर्जा इतका वाढला आहे की, तो दुसऱ्या स्थानावर राहणे म्हणजे जणू पराभवच मानले जाते. तसेच नीरजच्या भोवती स्पर्धा वाढली असून अन्य देशांतील प्रतिस्पर्धीही तितक्याच तयारीने मैदानात उतरत आहेत. त्यामुळे नीरजला सातत्याने मेहनत घ्यावी लागणार आहे. मुख्य म्हणजे गुरुवारी अंतिम फेरीत नीरजला सहापैकी फक्त एकाच प्रयत्नात ८५ मीटरहून पुढे भालाफेक करता आली.
नीरजने पहिल्या प्रयत्नात ८४.३५ मीटर, तर दुसऱ्या प्रयत्नात ८२ मीटर भालाफेक केली. नीरजचा तिसरा, चौथा व पाचवा प्रयत्न फाऊल ठरला. त्यावेळी नीरज तिसऱ्या स्थानावरही नव्हता. अखेरीस सहाव्या व शेवटच्या प्रयत्नात नीरजने ८५.०१ मीटर अंतरावर भालाफेक करून थेट दुसरा क्रमांक मिळवला.
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या केशोर्न वॅलकोटने ८४.९५ मीटर भालाफेकीसह तिसरे स्थान प्राप्त केले. ३१ वर्षीय वेबरने पहिल्याच प्रयत्नात ९१.३७मीटर भालाफेक करून आघाडी मिळवली होती. मग दुसऱ्या प्रयत्नात त्याने ९१.५१ मीटर अंतर गाठून जेतेपद निश्चित केले. वेबरने कारकीर्दीत प्रथमच डायमंड लीगचे जेतेपद मिळवले. २०२३मध्ये चेक प्रजासत्ताकचा याकूब वॅडलेच, तर २०२४मध्ये ग्रेनडाचा अँडरसन पीटर्स यांनी डायमंड लीग जिंकली होती. २०२४मध्ये तर नीरज फक्त ०.१ मीटरच्या फरकाने दुसऱ्या स्थानी राहिला होता.
दरम्यान, नीरजने यंदाच्या वर्षात नीरजने पॅरिस येथील डायमंड लीगचा टप्पा (८८१६ मीटर) व नीरज क्लासिक (८६.१६ मीटर) या दोन स्पर्धांचे जेतेपद मिळवले. तसेच गोल्डन स्पाईकमध्ये नीरजने ८५.२९ मीटरच्या भालाफेकीसह अग्रस्थान मिळवले. मात्र डायमंड लीगच्या अंतिम फेरीतील जेतेपद हुकल्याने आता जागतिक स्पर्धेत नीरजकडे पुन्हा लक्ष असेल. नीरजचे प्रशिक्षक जेन झेलेइनी यांनीही नीरजच्या तंदुरुस्तीसह तंत्रावर भर देणार असल्याचे सांगितले असून जागतिक स्पर्धेत तो नक्कीच ९० मीटर अंतर सर करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
आजचा दिवस माझ्यासाठी खडतर होता. कोणत्याही क्रीडापटूच्या कारकीर्दीत असा दिवस येतो. मात्र तरीही मी अखेरच्या प्रयत्नात ८५ मीटरचे अंतर सर केले. माझी भालाफेकीची वेळ चुकत होती. तसेच धावण्यावरही मला लक्ष द्यावे लागणार आहे. माझ्याकडे आता जागतिक स्पर्धेच्या तयारीसाठी ३ आठवडे असून तोपर्यंत लय मिळवण्यावर भर देईन.
नीरज चोप्रा
नीरज गेल्या ४ वर्षांपासून (२०२१) कोणत्याही स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहिलेला नाही. म्हणजेच त्याने सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धेत विजेतेपद किंवा दुसरा क्रमांक पटकावला आहे.
नीरजने २०२५ या वर्षात आतापर्यंत ३ स्पर्धा जिंकल्या. यामध्ये पॅरिस येथील डायमंड लीगचा टप्पा, ओस्त्रावा गोल्डन स्पाईक व नीरज चोप्रा क्लासिक यांचा समावेश आहे. मात्र यांपैकी एकाही स्पर्धेत नीरजला ९० मीटर अंतर गाठता आले नाही.
जागतिक स्पर्धेवर लक्ष
टोकियो येथे १३ ते २१ सप्टेंबर या कालावधीत जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा रंगणार आहे. त्यामध्ये नीरज गतविजेता म्हणून सहभागी होईल. २०२३ मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत नीरजने भालाफेकीत ८८.१७ मीटरच्या भालाफेकीसह जेतेपद मिळवले होते, तर २०२२मध्ये नीरज दुसऱ्या स्थानी होता. आता पुन्हा एकदा जागतिक स्पर्धेत नीरजला कडव्या प्रतिस्पध्र्थ्यांना सामोरे जावे लागेल. यामध्ये पाकिस्तानचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम, वेबर, पीटर्स, वेंडलेच यांचे कडवे आव्हान असेल.