

नवी दिल्ली : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रा ५ सप्टेंबर रोजी ब्रसेल्स येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील केवळ दोनच टप्प्यांत भाग घेतलेला असतानाही त्याने हे यश संपादन केले आहे.
२८ वर्षीय नीरजने १९ जून रोजी दोहा आणि २१ ऑगस्ट रोजी लुसान येथील डायमंड लीग टप्प्यांत दुसरे स्थान मिळवून १२ गुण मिळवले. या गुणांच्या जोरावर गुणतालिकेत सहावे स्थान पटकावत त्याने अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. झुरिच येथे या मालिकेतील १४वी आणि शेवटची फेरी गुरुवारी पार पडल्यानंतर ही अंतिम गुणतालिका जाहीर करण्यात आली. या वर्षातील १४ डायमंड लीग स्पर्धांपैकी पाच स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीचा समावेश होता, ज्यातील केवळ दोन स्पर्धांमध्ये नीरज सहभागी झाला होता.
गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून पाठीच्या खालच्या भागातील दुखापतीने त्रस्त असलेला नीरज आता पुनरागमन करत आहे. दुखापतीमुळे त्याच्या पुनरागमनाला दोहा डायमंड लीगपर्यंत विलंब झाला होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तो पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, तरीही त्याने ८५.८३ मीटर भालाफेक करत रौप्यपदक पटकावले. त्यानंतर लुसान डायमंड लीगमध्ये त्याने ८८.०५ मीटर भालाफेक करत कामगिरीत सुधारणा केली.
ब्रसेल्स येथे ४ आणि ५ सप्टेंबर असे दोन दिवस डायमंड लीगची अंतिम फेरी रंगणार आहे. ५ सप्टेंबर रोजी पुरुषांची भालाफेक स्पर्धा होईल. या स्पर्धेतील विजेत्याला डायमंड लीगची ट्रॉफी आणि किमान ३० हजार डॉलरचे पारितोषिक मिळेल. जर पुरुषांची भालाफेक ‘डायमंड+’ प्रकारात निवडली गेली, तर विजेत्याला ६० हजार डॉलर मिळतील.
अल्टिमेट चॅम्पियनशीपसाठीही शर्यतीत
११ ते १३ सप्टेंबर दरम्यान बुडापेस्ट येथे होणाऱ्या पहिल्या ‘जागतिक ॲथलेटिक्स अल्टीमेट चॅम्पियनशिप’साठीही नीरज चोप्रा पात्र ठरण्याच्या शर्यतीत आहे. या स्पर्धेत आठ भालाफेकपटू भाग घेणार असून नीरज सध्या सातव्या स्थानावर आहे, तर भारताचा सचिन यादव आठव्या स्थानावर आहे.
६ सप्टेंबर रोजी याची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
तूर्तास, डायमंड लीगच्या गुणतालिकेत श्रीलंकेचा रुमेश पाथिरागे ३९ गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्याने सर्व पाच स्पर्धांमध्ये भाग घेत चार स्पर्धा जिंकल्या. झुरिचमध्ये त्याने ९२.०७ मीटर भालाफेक करत प्रथम क्रमांक मिळवला. ग्रेनाडाचा दोन वेळचा जागतिक चॅम्पियन अँडरसन पीटर्स ३५ गुणांसह दुसऱ्या, तर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा जागतिक चॅम्पियन केशॉर्न वॉलकॉट २३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.