९० मीटर आणि जेतेपदाचे लक्ष्य! डायमंड लीगच्या अंतिम फेरीत आज नीरजवर लक्ष

दोन ऑलिम्पिक पदकविजेता भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा एकदा मैदानात परतणार आहे.
Neeraj Chopra
संग्रहित छायाचित्रPTI
Published on

ब्रसेल्स : दोन ऑलिम्पिक पदकविजेता भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा पुन्हा एकदा मैदानात परतणार आहे. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथील किंग बॉडेन स्टेडियमवर शनिवारी डायमंड लीगची अंतिम फेरी रंगणार आहे. यावेळी नीरज ९० मीटरचे लक्ष्य गाठण्यासह जेतेपद मिळवण्यात यशस्वी ठरणार का, याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागून आहे.

२६ वर्षीय नीरजने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक काबिज केले. तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या चार वर्षांच्या कालावधीत मात्र नीरजला अद्याप एकदाही ९० मीटरहून अधिक अंतरावर भालाफेक करता आली नाही. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिकमध्ये ९२.९७ मीटरच्या भालाफेकीसह सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे नीरजवरही दडपण वाढत असून त्याच्यासमोर माडींच्या स्नायूंच्या दुखापतीचेही आव्हान असेल. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत दुखापतीचे भय असल्याने नीरजने चार वेळा फाऊल केला होता. ऑगस्टमध्ये झालेल्या डायमंड लीगच्या लुसाने येथील टप्प्यात नीरजने ८९.४९ मीटर अंतरावर भालाफेक करून दुसरे स्थान प्राप्त केले. नीरजने १४ गुणांसह चौथ्या स्थानी राहत यावेळी अंतिम फेरी गाठली. आघाडीचे सहा भालाफेकपटू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

नीरजने पॅरिसमध्ये ८९.४५ मीटर अंतराची भालाफेकी केली. तर त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ मीटर इतकी आहे. २०२२च्या डायमंड लीगमध्ये त्याने इतके अंतर सर केले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून भालाफेकीतील स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे निरजलासुद्धा त्याचा दर्जा आणखी वाढवावा लागेल. २०२२मध्ये डायमंड लीग जिंकणाऱ्या नीरजला २०२३मध्ये दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते.

दरम्यान, डायमंड लीगच्या अंतिम फेरीतील विजेत्याला चषक आणि तीस हजार डॉलरचे (साधारण २५ लाख १९ हजार रुपये) रोख पारितोषिक दिले जाते. तसेच त्याला जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात येतो.

अर्शदची अनुपस्थिती ; आव्हान कोणाचे?

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीम डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे नीरज जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. अंतिम फेरीपर्यंतच्या गुणतालिकेत चेक प्रजासत्ताकचा याकूब वाडलेच, ग्रेनडाचा अँडरसन पीटर्स आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर हे नीरजपेक्षा वरच्या स्थानी राहिले. त्यामुळे या त्रिकुटाकडून नीरजला आव्हान मिळेल.

महाराष्ट्राच्या अविनाशवर नजरा

यंदा भारताचे प्रथमच दोन खेळाडू डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत अविनाश साबळे सहभागी होणार आहे. डायमंड लीगच्या गुणतालिकेत साबळे १४व्या स्थानी होता. त्याचे तीन गुण होते. त्याच्याहून वरच्या स्थानांवर असणाऱ्या इथियोपियाचा लामेचा गिरमा, न्यूझीलंडचा जोर्डी बीमिश, जपानचा रियुजी मुरा आणि अमेरिकेचा हिलेरी बोर यांनी माघार घेतल्याने साबळेला अव्वल १२ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले.

logo
marathi.freepressjournal.in