

लुसान : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रा शुक्रवारी पुन्हा एकदा मैदानात परतणार आहे. ब्रसेल्स येथे होणाऱ्या लुसान डायमंड लीग टप्प्यात नीरजसमोर राष्ट्रकुलमधील सुवर्णपदक विजेत्या रुमेश पाथिरागेचे कडवे आव्हान असेल. डायमंड लीगची अंतिम फेरी गाठण्याच्या दृष्टीने नीरजसाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. शुक्रवारी रात्री ११.५० वाजता भालाफेकीची स्पर्धा सुरू होईल.
ग्लास्गो येथे काही आठवड्यांपूर्वीच झालेल्या राष्ट्रकुलमध्ये २३ वर्षीय पाथिरागेने ८९.७५ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले होते, तर २८ वर्षीय नीरजला ८५.८३ मीटर कामगिरीसह रौप्यपदकावर समाधान बाळगावे लागले. यंदाच्या हंगामात पाथिरागे उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने सहभाग घेतलेल्या नऊपैकी आठ स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोचा जगज्जेता केशॉर्न वॉलकॉट, ग्रेनाडाचा माजी जगज्जेता अँडरसन पीटर्स, झेक प्रजासत्ताकचा याकुब व्हॅचलेच आणि जर्मनीचा माजी ऑलिम्पिक विजेता थॉमस रोहलर यांचेदेखील नीरजसमोर आव्हान असेल. विद्यमान जागतिक विजेता अर्शद नदीम आणि युरोपियन विजेता जर्मनीचा ज्युलियन वेबर यांनी मात्र स्पर्धेतून माघार घेतली आहे.
दुसरीकडे, गेल्या वर्षी सप्टेंबरपासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेला नीरज पुनरागमनाचा प्रयत्न करत आहे. माझी तंदुरुस्ती पूर्वीसारखी नाही, पण मी हळूहळू पूर्वपदावर येत आहे, असे नीरजने राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान सांगितले होते. “गेल्या १० महिन्यांच्या कालावधीने अशी परीक्षा घेतली, ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. भालाफेकीत काही थ्रो खूप लांब जातात आणि काही क्षण संपूर्ण प्रवासाचे वजन वाहून नेतात. अनेक दुखापतींमधून सावरणे, शरीर पुन्हा सक्षम करणे, लय शोधणे आणि मैदानात उतरण्याची घाई असताना संयम बाळगणे हे खूप कठीण होते. यावर्षी स्पर्धा खेळायला मिळेल की नाही, हे ठाऊक नसतानाही दररोज सराव करत होतो. या कठीण काळात पाठिंबा देणाऱ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार,” असे नीरज म्हणाला होता.
सध्या स्वित्झर्लंडमध्ये बालपणीचे प्रशिक्षक जयवीर चौधरी आणि फिजिओ ईशान मारवाह यांच्या मार्गदर्शनाखाली नीरज सराव करत आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. नीरजदेखील त्यांपैकीच एक आहे. त्यामुळे २०२१च्या टोकियो ऑलिम्पिकमधील या सुवर्णपदक विजेत्या भालाफेकपटूकडे शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा अवघ्या देशाचे लक्ष असेल.
वेळ : रात्री ११.५० वाजता
थेट प्रक्षेपण : वांडा डायमंड लीग यूट्यूब चॅनेल
हे माहीत आहे का?
नीरज डायमंड लीगच्या गुणतालिकेत सहा गुणांसह सातव्या स्थानावर आहे. अंतिम फेरीसाठी अव्वल सहा खेळाडू पात्र ठरणार असल्याने नीरजला येथे अव्वल तीनमध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे. पाथिरागे आणि पीटर्स यांनी अनुक्रमे २३ व २२ गुणांसह अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
लुसान डायमंड लीगमध्ये नीरजने यापूर्वी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने २०२२ मध्ये ८९.०८ मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावले होते, तर २०२४ मध्ये ८९.४९ मीटर कामगिरीसह तो उपविजेता ठरला होता. दुसरीकडे, श्रीलंकेचा पाथिरागे उत्तम फॉर्ममध्ये आहे. जूनमध्ये झालेल्या स्पर्धेत पाथिरागेने ९२.६२ मीटरची सर्वोत्तम कामगिरी केली होती.