बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नीरज चोप्रा बाहेर

नीरज येत्या २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाचा दावेदार होता
 बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नीरज चोप्रा बाहेर
Published on

भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यामुळे तो बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला. दुखापत झाल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नाही, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) एक निवेदनात दिली आहे. नीरज येत्या २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाचा दावेदार होता.

ओरेगॉन येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी नीरजने ८८.१३ मीटर अंतर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले होते. या स्पर्धेतील कामगिरीदरम्यान त्याला दुखापत झाली.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव राजीव मेहता यांनी सांगितले की, नीरजने आम्हाला त्याच्या दुखापतीबाबत माहिती देत तो राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकत नसल्याचे सांगितले.

त्यांनी माहिती दिली की, जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपदक स्पर्धेत अंतिम फेरीच्या वेळी त्याला झालेली दुखापत दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे तो राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नाही.

जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चौथ्या प्रयत्नाच्या वेळी नीरजच्या मांडीचा स्नायू दुखावला होता; मात्र त्याने स्पर्धा पूर्ण करता यावी, यासाठी मांडीला बँडेज बांधून भाला फेकला होता. अशा परिस्थितीही नीरजने रौप्यपदक मिळविले. पदक जिंकल्यानंतर त्याने दुखापतीबाबत सांगितले होते.

नीरज चोप्राने यंदाच्या हंगामात ९० मीटर मार्क पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्याने याच वर्षी स्टोकहोम डायमंड लीग २०२२मध्ये आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला होता. त्याने ८९.९४ मीटर भाला फेकला होता. त्यामुळे या हंगामात तो ९० मीटर मार्क ओलांडण्याची अपेक्षा होती; मात्र दुखापतीमुळे नीरज आता बॅकफूटवर गेला.

logo
marathi.freepressjournal.in