सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची भालाफेकपटू नीरजला खात्री; म्हणाला - "तिरंगा असलेली जर्सी घालून जेव्हा मी भाला घेऊन धावतो..."

भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रा सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावण्यासाठी सज्ज
सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची भालाफेकपटू नीरजला खात्री; म्हणाला - "तिरंगा असलेली जर्सी घालून जेव्हा मी भाला घेऊन धावतो..."

नवी दिल्ली : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रा सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावण्यासाठी सज्ज आहे. सध्या आपली तयारी उत्तम सुरू असून शरीरही साथ देत आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पुन्हा सुवर्ण जिंकण्यात यशस्वी होईन, असा विश्वास २६ वर्षीय नीरजने व्यक्त केला. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी नीरज सोमवारी दक्षिण आफ्रिका येथून टर्की येथे दाखल झाला.

नीरजने २०२१च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णकमाई केली होती. त्यानंतर नीरजने जागतिक, आशियाई या स्पर्धांमध्येही सुवर्ण काबिज केले. डायमंड लीगमध्येसुद्धा नीरजने वर्चस्व अबाधित राखले. आता २६ जुलैपासून रंगणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी नीरज टर्की येथे सराव करणार आहे. नीरजने २०२२च्या डायमंड लीगमध्ये ८९.९४ मीटर अंतरावर भालाफेक केली होती. ही त्याची आजवरची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. नीरजने यंदा ९० मीटरचे लक्ष्य पार करण्याचे ठरवले आहे.

“संपूर्ण देशाच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत. मात्र मी याचे दडपण न बाळगता याद्वारे स्वत:ला प्रेरित करतो. भारताचा तिरंगा असलेली जर्सी घालून जेव्हा मी भाला हातात घेऊन धावतो. तेव्हा डोळ्यांसमोर फक्त देशासाठी पदक जिंकायचे, इतकेच मला ठाऊक असते. सध्या माझे शरीर उत्तम लयीत असून सरावही जोरात सुरू आहे. मी सरावात आमूलाग्र बदल केला असून याचा मला फरक जाणवत आहे. ऑलिम्पिकपूर्वी मला सरावात ९० मीटरचे अंतर सर करायचे आहे. जेणेकरून मी मुख्य स्पर्धेत हे लक्ष्य साध्य करू शकेन,” असे नीरज म्हणाला.

नीरजची तयारी कशी असेल?

टर्की येथील ग्लोरिया स्पोर्ट्स एरिना येथे नीरज दाखल झाला असून सोबत त्याचे प्रशिक्षक डॉ. क्लॉस बार्टोनिएट्झ आणि फिजिओ इशान मारवा हेसुद्धा आहेत. पुढील ६० दिवस नीरज टर्कीत सराव करणार असल्याचे समजते. यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालय तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) यांच्याकडून निधीही पुरविण्यात आला आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये आशियाई स्पर्धेच्या स्वरूपात नीरज अखेरची स्पर्धा खेळला. आता मे महिन्यात दोहा येथे डायमंड लीग २०२४चा पहिला टप्पा रंगणार आहे. त्या स्पर्धेत नीरज सहभागी होणार आहे. मग तो थेट ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in