
दोहा : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा शुक्रवारपासून २०२५ या वर्षातील हंगामाची सुरुवात करणार आहे. दोहा येथे रंगणाऱ्या डायमंड लीगच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी नीरजसह भारताचा अन्य स्पर्धक किशोर जेनाही भालाफेकीत अव्वल तिघांत स्थान मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
ॲथलेटिक्समध्ये दरवर्षी विविध टप्प्यांत डायमंड लीग खेळवली जाते. ऑगस्टमध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी असते. पुढील ३-४ महिन्यांत खेळवण्यात येणाऱ्या विविध टप्प्यांद्वारे खेळाडूंना गुण देण्यात येतात व त्यानुसार एखादा खेळाडू जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकतो. जागतिक स्पर्धेत पात्र ठरणारा आपसुकच ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी शर्यतीत असतो. त्यामुळे डायमंड लीगचा प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे.
२७ वर्षीय नीरजला गतवर्षी डायमंड लीगच्या अंतिम फेरीत दुसऱ्या स्थानी समाधानी मानावे लागले. अवघ्या एका सेंटीमीटरमुळे नीरजचे जेतेपद हुकले. त्यावेळी जेतेपद मिळवणाऱ्या ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सकडून नीरजला पुन्हा कडवी झुंज मिळेल. यंदा सलग तिसऱ्यांदा दोहा येथील टप्प्याद्वारे नीरज आपल्या हंगामाला प्रारंभ करणार आहे. तसेच चेक प्रजासत्ताकचा जेकब वॅडलेच, केनियाचा ज्युलियस येगो, जर्मनीचा मॅक्स डेनहिंग हेसुद्धा नीरजसमोर आव्हान उभे करतील. पॅरिस ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम मात्र या स्पर्धेत वैयक्तिक कारणास्तव सहभागी होणार नाही.
दरम्यान, नीरज व २९ वर्षीय किशोर यांनी २०२३च्या आशियाई स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकावले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन भारतीयांकडून अशीच कामगिरी अपेक्षित आहे. एप्रिलमध्ये झालेल्या पोच आंतरराष्ट्रीय मीट स्पर्धेत नीरजने ८४.५२ मीटर अंतरासह जेतेपद मिळवले. मात्र ती फक्त प्रदर्शनीय स्पर्धा होती. नीरजने अद्याप एकदाही ९० मीटर अंतरापुढे भालाफेक केलेली नाही. त्यामुळे आता नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात तो ९० मीटरचा टप्पा गाठेल, अशी आशा आहे.
झेलेझ्नी ठरणार नीरजसाठी लकी?
पाच वर्षांपूर्वी मिळवलेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकापासून ते पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदकापर्यंत नीरजने जर्मनीच्या क्लॉस बार्टोनिझ यांच्या मार्गदर्शनात प्रगती केली. मात्र आता वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यामुळे बार्टोनिझ यांनी प्रशिक्षणातून निवृत्ती पत्करली आहे. त्यामुळे जानेवारीत नीरजने चेक प्रजासत्ताकच्या ५८ वर्षीय जॅन झेलेझ्नी यांची प्रशिक्षक म्हणून निवड केली. आता नीरज त्यांच्या मार्गदर्शनात पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणार आहे. झेलेझ्नी हे स्वत: खेळाडू म्हणून तब्बल तीन वेळा (१९९२, १९९६, २०००) ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते राहिले आहेत. तसेच भालाफेकीत ९८.४८ मीटर अंतर सर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्याच नावावर आहे. झेलेझ्नी यांनी अनेकदा ऑलिम्पिक व जागतिक पदके जिंकली. त्यामुळे झेलेझ्नी यांच्या मार्गदर्शनात नीरजही ९० मीटरचे अंतर गाठेल, अशी अपेक्षा आहे. नीरजने २०२२च्या डायमंड लीगमध्ये ८९.९४ मीटरपर्यंत भालाफेक केली होती. हेच त्याचे आजपर्यंतचे सर्वोत्तम अंतर आहे.
भारताचे यंदा एकूण चार स्पर्धक
एकीकडे नीरज व किशोर डायमंड लीगच्या पहिल्या टप्प्यात भालाफेकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार असताना यंदा धावण्याच्या प्रकारातही भारताचे दोन स्पर्धक सहभागी होताना दिसतील. पुरुषांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंग आपले कौशल्य दाखवेल. राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या गुलवीरची ही पहिलीच डायमंड लीग असेल. तसेच महिलांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत अनुभवी पारुल चौधरी सहभागी होईल. ३० वर्षीय पारुलने २०२३च्या आशियाई स्पर्धेत या प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे तिच्याकडून आता डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. गुलवीरची शर्यत रात्री १०.३० वाजल्यापासून, तर पारुलची शर्यत रात्री ११.३० वाजल्यापासून सुरू होईल.
नदीम आणि मी फक्त खेळापुरताच मित्र !
पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम आणि माझी फक्त खेळापुरताच मैत्री आहे. आमच्यात काही जवळचे नाते नाही. तसेच आता भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावानंतर आमची मैत्री आणखी घट्ट होईल, असेही वाटत नाही. मात्र नदीम माझा आदर करतो. माझ्याशी चांगला वागतो, म्हणूनच मीसुद्धा त्याला माणुसकीच्या नात्याने आदर देतो, असे स्पष्ट मत नीरजने गुरुवारी व्यक्त केले. बंगळुरू येथे रंगणाऱ्या ‘नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धे’साठी नीरजने नदीमला निमंत्रण देत स्पर्धते सहभागी होण्याची विनंती केली होती. त्यामुळे नीरजवर अनेकांनी टीका केली. मात्र नीरजने याबाबत खुलासा करताना पहलगाम येथील हल्ल्यापूर्वी हे निमंत्रण दिले होते, असे स्पष्ट केले. तसेच नदीमने त्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तूर्तास नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धासुद्धा युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर ढकलण्यात आली आहे. नदीमने २०२४च्या ऑलिम्पिकमध्ये ९२ मीटरहून पुढे भालाफेक करत सुवर्ण पटकावले, तर नीरजला ८९.४५ मीटर अंतरावर भालाफेक करूनही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
वेळ : रात्री १०.१५ वा. g थेट प्रक्षेपण : वांडा डायमंड लीग यूट्यूब वाहिनी आणि फेसबुक पेजवर.