टोकियो : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने ४ वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. आता चार वर्षांनी नीरज पुन्हा एकदा टोकियोत परतला असून यावेळी सलग दुसऱ्यांदा जागतिक सुवर्णपदक जिंकण्याचे त्याचे लक्ष्य असेल. टोकियो येथे शनिवारपासून जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत नीरजसह भारताच्या अन्य खेळाडूंवरही चाहत्यांचे लक्ष असेल.
१३ ते २१ सप्टेंबर या कालावधीत रंगणाऱ्या जागतिक स्पर्धेत भारताचे १९ खेळाडू सहभागी होणार आहेत. दर दोन वर्षांनी जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा जागतिक स्पर्धेचे २०वे पर्व आहे. २०२३मध्ये हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताने एकमेव सुवर्णदपदकासह १८वा क्रमांक मिळवला होता. नीरजनेच भारतासाठी ते सुवर्ण जिंकले होते.
दरम्यान, २७ वर्षीय नीरजने यापूर्वी २०२२च्या जागतिक स्पर्धेत रौप्य, तर २०२३च्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. यंदाच्या वर्षात नीरजला बहुतांश स्पर्धांमध्ये दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानी राहणाऱ्या नीरजने वर्षभरात फक्त गोल्डन स्पाईक व नीरज चोप्रा क्लासिक या स्पर्धा जिंकल्या. दोहा येथील डायमंड लीगच्या टप्प्यात नीरजने ९० मीटरचे अंतर गाठले होते. त्यामुळे आता जागतिक स्पर्धेत त्याच्या कामगिरीवर नजरा असतील. नीरज १७ तारखेला भालाफेकीत प्राथमिक फेरी खेळेल. १८ तारखेला भालाफेकीची अंतिम फेरी रंगणार आहे.
नीरजसह यंदा भारताचे एकूण चार जण भालाफेकीत सहभागी झाले आहेत. रोहित यादव, यशवीर सिंग व सचिन यादव यांच्याकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. इतिहासात प्रथमच एखाद्या जागतिक स्पर्धेत भालाफेकीत भारताचे चार खेळाडू सहभागी होणार आहेत. तसेच महिलांच्या भालाफेकीत अन्नू राणीवर लक्ष असेल.
शनिवारी भारताचे चार खेळाडू विविध गटांत दिसतील. त्यांपैकी पुरुषांच्या ३५ किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत राम बाबू व संदीप कुमार सहभागी होतील. महिलांच्या ३५ किमी चालण्याच्या शर्यतीत प्रियांका गोस्वामी भारताचे प्रतिनिधित्व करेल. तसेच महिलांच्या १,५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पूजा सहभागी होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचेही मनोरंजन होणार आहे.
जागतिक स्पर्धेसाठी भारताचा चमू
पुरुष : नीरज चोप्रा, सचिन यादव, रोहित यादव, यशवीर सिंग (भालाफेक), गुलवीर सिंग (५,००० व १०,००० मीटर शर्यत), प्रवीण चित्रावेल, अब्दुल्ला अबूबाकर (तिहेरी उडी), अनिमेश कुजूर (२०० मीटर शर्यत), तेजस शिर्से (१०० मीटर अडथळा शर्यत), सर्वेश कुशारे (उंच उडी), मुरली श्रीशंकर (लांब उडी), सर्व्हिन सेबास्टियन (२० किमी चालणे), राम बाबू, संदीप कुमार (३५ किमी चालणे).
महिला : पारुल चौधरी (३००० मीटर स्टीपलचेस), पूजा (१,५०० व ८०० मीटर धावणे), अंकिता ध्यानी (३००० मीटर स्टीपलचेस), अन्नू राणी (भालाफेक), प्रियांका गोस्वामी (३५ किमी चालणे).
यांच्यावरही लक्ष
जागतिक स्पर्धेत नीरजव्यतिरिक्त अन्य भारतीय स्पर्धकही पदकाचे दावेदार आहेत. त्यांच्यामध्ये स्टीपलचेस शर्यतीत पारुल चौधरी, लांब उडीत मुरली श्रीशंकर, भालाफेकीत अन्नू राणी, उंच उडीत महाराष्ट्राचा सर्वेश कुशारे यांचा समावेश आहे. त्यामुळे एकूणच आता जागतिक स्पर्धेची उत्सुकता आहे.