नीरज चोप्राच्या वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले; आईला अत्यानंद

आनंदाने भारावून गेलेली नीरजची आई सरोज देवी म्हणाल्या की, मुलगा घरी येताच त्याला चुरमा खायला देईन
नीरज चोप्राच्या वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले; आईला अत्यानंद

साता समुद्रापार अमेरिकेपासून हजारो किलोमीटर दूर हरियाणाच्या खांद्रा गावात रविवारी सकाळी ७च्या सुमारास शेकडो डोळे टीव्हीकडे लागून राहिलेले असतानाच नीरज चोप्राने रौप्यपदकावर नाव कोरले आणि त्याच्या वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले; तर आईला अत्यानंद झाला. देशाची राजधानी दिल्लीतही जल्लोष साजरा करण्यात आला.

आनंदाने भारावून गेलेली नीरजची आई सरोज देवी म्हणाल्या की, मुलगा घरी येताच त्याला चुरमा खायला देईन. मी खूप आनंदी आहे. कष्टाचे फळ मिळाले. या स्पर्धेत तो पदक जिंकेल याची आम्हाला खात्री होती. वडील सतीश कुमार म्हणाले की, आता त्याला देशासाठी सुवर्णपदकदेखील आणावे लागेल.

फायनल सुरू होताच गावकरी स्क्रीनसमोर बसले. सुरुवातीला नीरजच्या ओपनिंग थ्रोमुळे निराशा झाली; परंतु गावातील वृद्ध लोक म्हणाले, अजून स्पर्धा संपलेली नाही. त्यानंतर ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ९० मीटरहून अधिक दूर भाला फेकला तेव्हा पदक हातातून निसटून जाण्याच्या शक्यतेने शांतता पसरली.

नीरजने दुसऱ्या थ्रोमध्ये ८२.३९ आणि तिसऱ्या थ्रोमध्ये ८६.३७ मीटर दूर भाला फेकला. हे पदकासाठी पुरेसे नव्हते. त्यानंतर नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर दूर भालाफेक केली. त्यानंतर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सगळे आनंदात जल्लोष करू लागले. नीरजचे रौप्यपदक जाहीर होताच नीरजच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

पहाटे ४ वाजल्यापासूनच खांद्रा गावाला ऐतिहासिक क्षणाची प्रतीक्षा लागून राहिली होती. संपूर्ण गाव नीरजच्या घरी जमले होते. अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. पदक जाहीर होताच मिठाई आणि लाडू वाटण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in