नीरज चोप्राचा नवा राष्ट्रीय विक्रम,पहिल्याच स्पर्धेत पटकावले रौप्य पदक

मागील वर्षी मार्च महिन्यात त्याने पतियालामध्ये ८८.०७ मीटर दूर भाला फेकला होता
नीरज चोप्राचा नवा राष्ट्रीय विक्रम,पहिल्याच स्पर्धेत पटकावले रौप्य पदक

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकामगिरी करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने फिनलॅण्डमधील पावो नूरमी गेम्स २०२२ मध्ये ८९.३० मीटर दूर भालाफेक करत पुन्हा एक विक्रम प्रस्थापित केला. नवा राष्ट्रीय विक्रम केला. ऑलिम्पिकनंतरच्या आपल्या पहिल्याच स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले.

यापूर्वीचा विक्रमही नीरजच्याच नावे होता. मागील वर्षी मार्च महिन्यात त्याने पतियालामध्ये ८८.०७ मीटर दूर भाला फेकला होता. ७ ऑगस्ट २०२१ रोजी त्याने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकाविले होते. नीरज हा अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक पटकावणारा पहिला खेळाडू ठरला होता.

दरम्यान, या स्पर्धेमध्ये फिनलॅण्डच्या ऑलिव्हर हीलॅण्डरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याने ८९.८३ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्ण पदक मिळविले. नीरजच्या तुलनेत ऑलिव्हरने ०.५३ मीटरच्या अंतराच्या फरकाने पहिला क्रमांक पटकाविला.

ऑलिम्पिकनंतर नीरज सुमारे १० महिने स्पर्धांपासून दूर होता. एवढ्या मोठ्या विश्रांतीनंतर नीरज आता पुन्हा मैदानावर उतरला असून त्याने जवळजवळ ९० मीटरपर्यंत भालाफेक करत दमदार कामगिरी केली. नीरज हा पावो नूरमी गेम्समध्ये सहभाग घेणारा एकमेव भारतीय स्पर्धक आहे.

पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची पूर्वतयारी म्हणून नीरज फॉर्ममध्ये परत आल्याने आता त्याच्याकडून अधिक चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. या स्पर्धेनंतर नीरज फिनलॅण्डमधील कुओर्तने गेम्समध्ये भाग घेणार आहे. त्यानंतर तो डायमंड लीगच्या स्टॉकहोम लेगसाठी स्वीडनला रवाना होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in