
बुडापेस्ट (हंगेरी) : भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी धडाकेबाज कामगिरी नोंदवली. पुढील वर्षी म्हणजेच २०२४मध्ये रंगणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील स्थान पक्के करतानाच नीरजने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारातील अंतिम फेरीत धडक मारली. त्यामुळे आता रविवारी नीरज ऐतिहासिक सुवर्णपदकासाठी दावेदारी पेश करणार आहे. नीरजव्यतिरिक्त डीपी मनू आणि किशोर जेना यांनीही अंतिम फेरीतील स्थान पक्के केले आहे.
बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकही पदक मिळवलेले नाही. त्यामुळे २५ वर्षीय नीरजवरच तमाम भारतीयांच्या अपेक्षा टिकून आहेत. शुक्रवारी पात्रता फेरीत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटर अंतरावर विक्रमी भालाफेक केली. स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भालाफेकपटूंनी ८३ मीटर अंतर सर करणे गरजेचे होते. तर ऑलिम्पिक पात्रतेसाठी ८५.५० मीटर अंतर गाठणे अनिवार्य होते. नीरजने पहिल्याच प्रयत्नात दोन्ही साध्य केल्यामुळे उर्वरित फेरीत त्याला भागसुद्धा घ्यावा लागला नाही. नीरजची ही या हंगामातील सर्वोत्तम भालफेकसुद्धा होती. साहजिकच नीरजने पात्रता फेरीत अग्रस्थान मिळवले. गेल्या वर्षी झालेल्या जागतिक स्पर्धेत नीरजने रौप्यपदक पटकावले होते. यंदा मात्र तो सुवर्णपदकासह मायदेशी परतेल, अशी आशा आहे.
अ आणि ब अशा गटांत भालाफेकपटूंना विभागण्यात आले होते. नीरजसह मनूनेसुद्धा अ-गटातून आगेकूच केली. त्याला ८३ मीटरचे अंतर सर करता आले नसले, तरी दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८२.३५ मीटर अंतरावर भालाफेक केली होती. यामुळे त्याने सहाव्या क्रमांकासह अंतिम फेरी गाठली. ब-गटात किशोरने पहिल्या प्रयत्नात ८०.५५ मीटर अंतरावर भालाफेक केली. यामुळे तो नवव्या स्थानासह अंतिम फेरीत पोहोचला.
चांद्रयान-३चे यश आणि बुद्धिबळपटू प्रज्ञानंदच्या कामगिरीमुळे मला अधिक प्रेरणा मिळाली. गेल्या वर्षी केलेल्या चुकांमधून बोध घेत मी यावेळी पहिल्याच प्रयत्नात सर्वस्व झोकून दिले. रविवारीसुद्धा अशीच कामगिरी करून देशासाठी जागतिक सुवर्णपदक जिंकण्याचा माझा मानस आहे.
- नीरज चोप्रा
पाकिस्तानचा अर्शद दुसऱ्या स्थानी; गतविजेता पीटर्स गारद
२०२२चा राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता तसेच नीरजचा चांगला मित्र असलेल्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळवले. त्याने तिसऱ्या प्रयत्नात ८६.७९ मीटर अंतरावर भालाफेक केली. त्यामुळे रविवारी नीरजला अर्शदकडून कडवे आव्हान असेल. मात्र गत जागतिक सुवर्णपदक विजेता ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्सला धक्कादायकरीत्या पात्रता फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. पीटर्सने ७८.४९ मीटर भालाफेकीसह तब्बल १६वा क्रमांक मिळवला.