

दोहा : भारताच्या नीरज कुमारने येथे बुधवारी झालेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्यपदक पटकावत २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी पात्रता कोटा मिळवला. या स्पर्धेतील भारताचा हा दुसरा ऑलिम्पिक कोटा ठरला आहे. यापूर्वी जयपाल मालवीयने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक जिंकून भारताला पहिला कोटा मिळवून दिला होता.
अंतिम फेरीत नीरजने ३४६.५ गुणांची कमाई केली. तो रौप्यपदकाच्या शर्यतीत होता. मात्र, ३४व्या प्रयत्नात ९.४ गुणांची नोंद झाल्याने त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. वैयक्तिक तटस्थ खेळाडू (एआयएन) दिमित्री पिमेनोव्हने ३६२.८ गुणांसह कनिष्ठ गटातील विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकले. स्लोव्हाकियाच्या पॅट्रिक जॅनीने रौप्यपदक मिळवले. या दोघांनीही ऑलिम्पिक कोटा मिळवला. अंतिम फेरीत सहभागी झालेला भारताचा आणखी एक नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर ३२३.७ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला.
पात्रता फेरीत नीरजने ५९१ गुणांसह अव्वल स्थान मिळवले. ऐश्वर्यने ५८६ गुणांसह चौथे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेत यापूर्वी रौप्यपदक जिंकलेल्या ऐश्वर्यसाठी अंतिम फेरी आव्हानात्मक ठरली. गुडघ्यावरून नेम साधण्याच्या प्रकारात त्याने १० प्रयत्नांत १०२.९ गुण मिळवत आघाडीच्या खेळाडूंसोबत बरोबरी साधली होती. मात्र, आडवे झोपून नेम साधण्याच्या प्रकारात त्याला सातत्याने नऊ गुण मिळाल्याने तो पिछाडीवर पडला. उभे राहून नेम साधण्याच्या प्रकारातही त्याची कामगिरी सुधारली नाही आणि अखेर त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे, २६ वर्षीय नौदलातील नेमबाज नीरजने संयम राखत पदकाच्या शर्यतीत आपले स्थान कायम ठेवले. नुकत्याच झालेल्या आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. अंतिम फेरीत त्याची कामगिरी रौप्यपदक आणि ऑलिम्पिक कोटा मिळवण्याच्या दिशेने सुरू होती. मात्र, ९.४ गुणांच्या एका प्रयत्नाने त्याचे स्थान बदलले. जॅनीने १०.४ गुणांची नोंद करत नीरजला मागे टाकले आणि रौप्यपदक पटकावले. पिमेनोव्हने मात्र प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूपच सरस कामगिरी करत कनिष्ठ गटातील विश्वविक्रमासह सुवर्णपदकावर नाव कोरले.
सांघिक प्रकारातही कांस्यपदक
भारताने सांघिक प्रकारातही कांस्यपदकाची कमाई केली. नीरज, ऐश्वर्य आणि अखिल शेरॉन यांनी मिळून बाद फेरीत १,७५१ गुणांची नोंद केली. नॉर्वेने १,७५२ गुणांसह भारताला केवळ एका गुणाने मागे टाकत रौप्यपदक मिळवले. तर चेक प्रजासत्ताकाने १,७५४ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. भारताकडून नीरजने ५८२, ऐश्वर्यने ५८७ आणि अखिलने ५८२ गुणांची कमाई केली.