Diamond League Athletics: नीरजला हिऱ्याची हुलकावणी! अवघ्या एका सेंटीमीटरमुळे डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानी समाधान

भारताचा भालाफेकीतील हिरा नीरज चोप्राला रविवारी मध्यरात्री डायमंड लीगच्या जेतेपदाने अवघ्या एका सेंटीमीटरने हुलकावणी दिली. दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या नीरजला ८७.८६ मीटरच्या भालाफेकीसह दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
Diamond League Athletics: नीरजला हिऱ्याची हुलकावणी! अवघ्या एका सेंटीमीटरमुळे डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानी समाधान
@Neeraj_chopra1/X
Published on

ब्रसेल्स : भारताचा भालाफेकीतील हिरा नीरज चोप्राला रविवारी मध्यरात्री डायमंड लीगच्या जेतेपदाने अवघ्या एका सेंटीमीटरने हुलकावणी दिली. दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या नीरजला ८७.८६ मीटरच्या भालाफेकीसह दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८७.८७ मीटर अंतर सर करून जेतेपद काबिज केले. याबरोबरच यंदाच्या ॲथलेटिक्स हंगामाचा शेवट झाला. यंदाच्या हंगामात बहुतांशी स्पर्धांमध्ये नीरज दुसऱ्या स्थानी राहिला.

२६ वर्षीय नीरजने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक काबिज केले, तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या चार वर्षांच्या कालावधीत मात्र नीरजला अद्याप एकदाही ९० मीटरहून अधिक अंतरावर भालाफेक करता आली नाही. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिकमध्ये ९२.९७ मीटरच्या भालाफेकीसह सुवर्णपदक मिळवले होते. यावेळी अर्शद अंतिम फेरीसाठी अपात्र ठरल्याने नीरजला जेतेपदाची सुवर्णसंधी होती. मात्र हाताच्या दुखापतीसह खेळणाऱ्या नीरजला अवघ्या एका सेंटीमीटरमुळे जेतेपद गमवावे लागले.

२०२२मध्ये डायमंड लीग जिंकणाऱ्या नीरजने यावेळी अंतिम फेरीतील तिसऱ्या प्रयत्नात ८७.८६ मीटर अंतर सर केले. तर पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या पीटर्सने पहिल्याच प्रयत्नात ८७.८७ मीटर अंतर सर केले होते. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ८५.९७ मीटरच्या भालाफेकीसह तिसरे स्थान प्राप्त केले. डायमंड लीगच्या अंतिम फेरीतील विजेत्याला चषक आणि तीस हजार डॉलरचे (साधारण २५ लाख १९ हजार रुपये) रोख पारितोषिक दिले जाते. तसेच त्याला जागतिक अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात येतो. नीरज १२ हजार अमेरिकन डॉलरचा मानकरी ठरला.

नीरजने २०२२मध्ये ही स्पर्धा जिंकताना ८८.४४ मीटर अंतर सर केले होते. २०२३मध्ये त्याला ८३.८० मीटरसह दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. तेव्हा चेक प्रजासत्ताकच्या जेकब वॅडेलचने बाजी मारली. आता सलग दुसऱ्या वर्षी नीरजचे डायमंड लीग जेतेपद हुकले आहे. यंदा नीरजने डायमंड लीगच्या विविध टप्प्यांत दुसरे स्थान प्राप्त केले. भुवनेश्वरच्या फेडरेशन चषक राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्ण जिंकले. तसेच पावो नुरुमी गेम्समध्येही त्याने अग्रस्थान प्राप्त केले. मात्र ऑलिम्पिकमध्ये त्याला रौप्यवर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये अधिक चांगली तयारी व तंदुरुस्तीसह नीरज ९० मीटरचे अंतर गाठेल, अशी आशा आहे.

नीरजवर गेल्या काही काळापासून प्रतिस्पर्ध्यांचे दडपण वाढत असून त्याच्यासमोर माडींच्या स्नायूंच्या दुखापतीचेही आव्हान आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत दुखापतीचे भय असल्याने नीरजने चार वेळा फाऊल केला होता. तसेच तो सप्टेंबरमध्ये जर्मनीत शस्त्रक्रिया करणे अपेक्षित होते. मात्र डायमंड लीगमुळे त्याने काही महिन्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. “माझ्या डाव्या हाताला दुखापत झाली असून फ्रॅक्चरही झाले आहे. भालाफेकीत माझा भाला कितपत दूर जाणार, हे उजव्या हातापेक्षा डाव्या हातावर अवलंबून असते. मला असह्य वेदना जाणवत आहेत. मात्र माझ्या सहाय्यकांनी केलेल्या मेहतनीमुळे मी अंतिम फेरीत सहभागी होऊ शकलो. यंदाच्या हंगामातील माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी नाही. पुढील वर्षी अधिक तयारीसह तसेच लवकरच हाताच्या व स्नायूंच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करून मैदानात परतेन. तुमची साथ अशीच असू दे,” असेही नीरज यावेळी म्हणाला.

वर्षातील ही अखेरची स्पर्धा होती. त्यामुळे मला जेतेपदासह सांगता करण्याची इच्छा होती. मात्र त्यामध्ये मी अपयशी ठरलो. यंदाचे वर्ष बरेच काही शिकवणारे ठरले. पुढील वर्षात पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतेन.

- नीरज चोप्रा

> नीरजने या वर्षात फक्त पावो नुरुमी गेम्सच्या रूपात एकमेव आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली.

हाताच्या फ्रॅक्चरसह अंतिम फेरीत सहभागी

नीरज हाताच्या फ्रॅक्चरसह डायमंड लीगच्या अंतिम फेरीत सहभागी झाला होता. मात्र त्याने ते चाहत्यांना जाणवू दिले नाही. अंतिम फेरीत दुसरे स्थान मिळवल्यावर नीरजने ट्विटरवर हाताच्या एक्स-रेचे छायाचित्र पोस्ट केले. शनिवारी सरावादरम्यानच नीरजला दुखापत झाली होती. मात्र डायमंड लीगची अंतिम फेरी असल्याने तो दुखापतीसह खेळला.

अविनाश चक्क नवव्या स्थानी

भारताचा ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीमधील राष्ट्रीय विक्रमवीर अविनाश साबळेने डायमंड लीगच्या अंतिम फेरीतील पदार्पणात निराशाजनक कामगिरी केली. एकूण १० धावपटूंचा सहभाग असलेल्या शर्यतीत साबळे नवव्या स्थानावर राहिला. आपल्या ३०व्या वाढदिवशी अविनाशला सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीच्या जवळपासही पोहोचता आले नाही. त्याने ८ मिनिटे १७.०९ सेकंद अशी वेळ नोंदवली. केनियाच्या आमोस सेरेमने ८ मिनिटे ६.९० सेकंद वेळेसह डायमंड लीगचा नवा विजेता म्हणून लौकिक मिळवला. मोरोक्कोचा ऑलिम्पिक आणि जागतिक विजेता सोफिया बक्कालीला ८ मिनिटे ८.६० सेकंद वेळेसह दुसऱ्या स्थानी राहिला. बीडच्या अविनाशने मात्र यावेळी पूर्ण निराशा केली.

logo
marathi.freepressjournal.in