नवी दिल्ली : भारताचा तारांकित भालेफेकपटू नीरजने जागतिक ॲथलेटिक्स संघटनेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. “टेनिस, फुटबॉल, क्रिकेट यांसारख्या खेळांत जितका पैसा आहे, तितका ॲथलेटिक्समध्ये नाही. मात्र संघटनेच्या या निर्णयामुळे ॲथलिट्सचे मनोबल उंचावले जाईल. अन्य क्रीडा प्रकारांनीसुद्धा याद्वारे प्रेरणा घेत पदकविजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिकही द्यावे, जेणेकरून खेळाडूंचे भविष्य सुरक्षित होईल,” असे नीरज म्हणाला.
“पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी मी ९० मीटरचे अंतर गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. मला माझ्या क्षमतेवर व मेहनतीवर विश्वास आहे. माझे शरीर सध्या उत्तम लयीत असून तंदुरुस्तीवर मी अधिक लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे यावेळी ९० मीटरचे अंतर गाठेनच,” असे नीरज म्हणाला. किशोर जेनासुद्धा ९० मीटरचे अंतर गाठू शकतो, असेही नीरजने सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज व किशोर या भारताच्याच दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण व रौप्यपदक काबिज केले होते. नीरजने २०२२च्या डायमंड लीगमध्ये ८९.९४ मीटर अंतरावर भालाफेक केली होती. यंदा त्याचे ९० मीटरचे अंतर गाठण्याचे लक्ष्य आहे.