FIFA अध्यक्षांबाबत अविश्वास! नेदरलँड्स फुटबॉल महासंघाचे आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आवाहन

फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत नेदरलँड्स (डच) फुटबॉल महासंघाने त्यांचा पाठिंबा काढून घेतला आहे.
FIFA अध्यक्षांबाबत अविश्वास! नेदरलँड्स फुटबॉल महासंघाचे आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आवाहन
FIFA अध्यक्षांबाबत अविश्वास! नेदरलँड्स फुटबॉल महासंघाचे आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आवाहन(Photo-X)
Published on

ॲमस्टरडॅम : फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत नेदरलँड्स (डच) फुटबॉल महासंघाने त्यांचा पाठिंबा काढून घेतला आहे. जागतिक फुटबॉल नियामक संस्थेच्या भविष्याविषयी आणि पुनर्रचनेविषयी चर्चा करण्यासाठी डच महासंघाने रविवारी आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.

फिफाला केवळ नवीन अध्यक्षांचीच नव्हे, तर एका संपूर्ण ‘नव्या फिफा’ची गरज असल्याचे महासंघाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. २०२७ मध्ये होणारी अध्यक्षीय

निवडणूक ही केवळ फिफाचे नेतृत्व कोण करणार यापुरती मर्यादित नसावी, तर फुटबॉल जगताला नेमक्या कोणत्या प्रकारच्या फिफाची गरज आहे, यावर आधी चर्चा झाली पाहिजे, असे डच महासंघाने स्पष्ट केले.

ही चर्चा केवळ जियानी इन्फँटिनो यांच्यापुरती मर्यादित नसून, सर्व २११ सदस्य देश आणि सहा खंडांतील महासंघांना एकत्र घेऊन नवी दिशा ठरवण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी ‘युएफा’चे अध्यक्ष अलेक्झांडर सेफेरिन यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

फिफा अध्यक्षांकडे अफाट सत्ता केंद्रित झाली असून अध्यक्ष आणि प्रशासन यांच्यात योग्य संतुलन उरलेले नाही, असा आरोप डच महासंघाने केला आहे. मागे घेतलेल्या ‘फिफा फॉरवर्ड एंटरप्राइज’ प्रस्तावामुळे

गमावलेला विश्वास सहजासहजी परत येणार नाही. त्यामुळे उत्तम प्रशासन, सत्तेचे संतुलन, फुटबॉलच्या सामाजिक शक्तीचा वापर आणि जागतिक स्तरावर अधिक गुंतवणूक या तीन प्राधान्यक्रमांवर काम करण्याची गरज महासंघाने व्यक्त केली आहे.

फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांच्यासाठी हा कठीण काळ मानला जात आहे.

‘वर्ल्डकप’सह फिफाच्या स्पर्धांचे व्यावसायिक हक्क खासगी गुंतवणूकदारांना विकण्याची त्यांची योजना अपयशी ठरल्यानंतर फुटबॉल वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

इन्फँटिनो यांच्या प्रतिमेसाठी २५ कोटींचा करार

‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी ‘फिफा’ने लंडनस्थित एका मार्केटिंग एजन्सीसोबत २३ लाख पाउंड (सुमारे ३१ लाख डॉलर) चा करार केल्याचा दावा ब्रिटीश वृत्तपत्र ‘द टाइम्स’ने केला आहे. लंडनस्थित ‘टेन टोझ मीडिया’ या क्रीडा मार्केटिंग आणि डिजिटल मीडिया एजन्सीसोबत हा २२ महिन्यांचा करार करण्यात आला आहे. हा करार मार्च २०२५ पासून सुरू झाला असून तो डिसेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे. कराराच्या प्रतीनुसार, ही एजन्सी ‘फिफा’ची लिंक्डइन, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील खाती सांभाळणार आहे. अध्यक्षांच्या दृष्टिकोनानुसार कथा मांडणे, नियोजन, अंमलबजावणी आणि नियंत्रणासाठी आवश्यक ती मदत व विश्लेषण पुरवणे, तसेच ‘फिफा’ आणि अध्यक्षांच्या प्रतिमेचे रक्षण करून संघटनेची पत वाढवणे हे या कराराचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासाठी मजकूर, चित्रे, व्हिडीओ आणि इन्फोग्राफिक्स तयार करणे, कमेंट्सवर लक्ष ठेवणे आणि इन्फ्लुएन्सर्सचा वापर करणे या कामांचा यात समावेश आहे.

पद सोडण्याचे संकेत नाहीत

इन्फँटिनो यांच्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावरून उद्भवलेल्या वादानंतर युरोपियन फुटबॉल महासंघाने (युएफा) त्यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी अनेक युरोपियन महासंघांनी इन्फँटिनो यांचा पाठिंबा काढून घेतला असून काहींनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, इन्फँटिनो यांनी पद सोडण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in