हालँड जबरदस्त, ब्राझील उद्ध्वस्त! नॉर्वे प्रथमच फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत; माजी विजेत्यांवर २-१ अशी मात

नॉर्वेच्या एर्लिग हालँडच्या रूपात सोमवारी फुटबॉल विश्वात आणखी एका नवा ताऱ्याचा उदय झाला, असे आता ठामपणे म्हणता येईल.
हालँड जबरदस्त, ब्राझील उद्ध्वस्त! नॉर्वे प्रथमच फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत; माजी विजेत्यांवर २-१ अशी मात
हालँड जबरदस्त, ब्राझील उद्ध्वस्त! नॉर्वे प्रथमच फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत; माजी विजेत्यांवर २-१ अशी मात
Published on

ईस्ट रुदरफोर्ड : नॉर्वेच्या एर्लिग हालँडच्या रूपात सोमवारी फुटबॉल विश्वात आणखी एका नवा ताऱ्याचा उदय झाला, असे आता ठामपणे म्हणता येईल. ६ फूट ५ इंच इतकी उंची असलेल्या या २५ वर्षीय आक्रमणपटूने केलेल्या दोन अफलातून गोलच्या बळावर नॉर्वेने सोमवारी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पाच वेळच्या विजेत्या ब्राझीलला २-१ असे पराभूत केले. याबरोबरच नॉर्वेने प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली, तर नेयमारसह ब्राझीलच्या संघाचे व त्यांच्या तमाम चाहत्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.

न्यूयॉर्क येथील मेटलाईफ स्टेडियमवर तब्बल ८० हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने झालेल्या या लढतीत हालँडने अनुक्रमे ७९ आणि ९०व्या मिनिटाला गोल झळकावले. ३४ वर्षीय नेयमारने कारकीर्दीतील अखेरच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भरपाई वेळेत (९०+१० मि.) पेनल्टीद्वारे गोल करून ब्राझीलच्य चाहत्यांना दिलासा दिला. मात्र पराभवामुळे त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केला. पहिल्या सत्रात पेनल्टीवर गोल करण्याची गमावलेली संधी ब्राझीलला महागात पडली. १९९० नंतर प्रथमच म्हणजे ३८ वर्षांनी ब्राझीलला किमान उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले. दुसरीकडे नॉर्वेने २८ वर्षांनी विश्वचषकासाठी पात्र ठरल्यानंतर ऐतिहासिक कामगिरी करताना उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश पक्का केला. आता त्यांची रविवार, १२ जुलै रोजी इंग्लंडशी गाठ पडेल.

दरम्यान, ब्राझीलचे प्रशिक्षक कार्लो अँसेलोटी यांनी नेयमार या लढतीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे म्हटले होते. मात्र तो पहिल्या सत्रात मैदानात आला नाही. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांत गोलशून्य बरोबरी कायम राहिली. व्हिनिशियस ज्युनियर, गैब्रिएल मार्टिनेली या ब्राझीलच्या आक्रमणपटूंना फारसा प्रभाव पाडता आला नाही.

दुसऱ्या सत्रात नेयमारचे ६५व्या मिनिटानंतर मैदानात आगमन झाले. पाणी पिण्याच्या विश्रांतीदरम्यान प्रशिक्षक स्टॉल सोलबॅकन यांनी हालँडला पूर्ण ताकदीने खेळण्याचा सल्ला दिला. याचा फायदा उठवत बदली खेळाडू म्हणून आलेल्या अँड्रियासने दिलेल्या सुंदर पासवर हालँडने हेडरद्वारे अप्रतिम गोल केला. त्यानंतर काही वेळातच डॅनिलोच्या पायांमधून चेंडू काढत हालँडने या स्पर्धेतील आपला सातवा गोल नोंदवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग १४व्या सामन्यांत गोल करण्याचा पराक्रम हालँडने केला.

सामना संपायला काही मिनिटे असताना नॉर्वेच्या खेळाडूने चूक केल्यामुळे ब्राझीलला पेनल्टी मिळाली. नेयमारने त्यावर गोल नोंदवला. मात्र तोपर्यंत ब्राझीलचा पराभव स्पष्ट झाला होता. अखेरीस पंचांनी सामना संपल्याची शिटी वाजवली व नेयमार आणि ब्राझीलच्या अन्य खेळाडूंना मैदानातच रडू कोसळले.

विश्वचषकात हार्लेडने यंदाच्या ४ सामन्यांत ७ गोल केले आहेत. मुख्य म्हणजे आतापर्यंत विश्वचषकातील प्रत्येक लढतीत किमान १ गोल करण्याची परंपरा त्याने कायम राखली आहे.

यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत सापर्यंत ३ खेळाडूंनी किमान ७ गोल केले आहेत. मेस्सी, एम्बाप्पे व हालैंड यांनी ही कामगिरी केली आहे. एखाद्या विश्वचषकात प्रथमच तीन खेळाडूंनी ७ गोल नोंदवले आहेत, हे विशेष.

गोलफलक

  • नॉर्वे (२) - ब्राझील (१)

  • एर्लिंग हालैंड (७९वे, ९०वे मि.) - नेयमार (९०+१० मि.)

नॉर्वेची नौका

नॉर्वेचा संघ प्रत्येक विजयानंतर विशेष शैलीत सेलिब्रेशन करत आहे. सोमवारी हालँडने ड्रम वाजवला व त्याच्या ठेक्यावर सहकाऱ्यांसह स्टेडियममधील उपस्थित चाहत्यांनी 'रो, रो'चा जयघोष केला. जणू काही संपूर्ण स्टेडियम एकप्रकारे नौकानयन करत असल्याचे यावेळी जाणवते. काही दिवसांपूर्वीच फिफाने त्यांच्यासाठी 'नाखवा बोटीनं फिरवाल का' या मराठी गाण्याच्या कॅप्शनसह फोटो पोस्ट केला होता. २०२५च्या डिसेंबरपासून नॉर्वेच्या संघाने विजयानंतर ही प्रथा सुरू केली आहे. याला 'वायकिंग रो' असे म्हटले जात आहे.

१९९० नंतर पहिल्यांदाच ब्राझील संघ आहे. विश्वचषकाच्या बाद फेरीत युरोपियन देशांविरुद्ध ब्राझीलचा हा सलग सातवा पराभव ठरला आहे.

नॉर्वेचा फुटबॉल संघ केवळ चौथा विश्वचषक खेळत असून १९९८ नंतर पहिल्यांदाच म्हणजेच २८ वर्षांनी ते अंतिम १६ फेरीच्या पुढे जाण्यात यशस्वी ठरले आहेत.

नॉर्वेने विश्वचषकात ब्राझीलवर सलग दुसरा विजय मिळवला. यापूर्वी १९९८च्या विश्वचषकात त्यांनी ब्राझीलला साखळी फेरीत नमवले होते. त्यानंतर आता २८ वर्षांनी पुन्हा एकदा त्यांनी हा करिष्मा केला.

गोलरक्षक नायलँडची छाप

नॉर्वेचा ३५ वर्षीय गोलरक्षक ओर्यान नायलँडने याने सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत ब्राझीलचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. सामन्याच्या १४व्या मिनिटाला त्याने डाव्या बाजूला सूर मारत ब्रुनो गुइमारेसची पेनल्टी किक रोखली. त्यानंतर सामना संपण्याच्या काही वेळ आधी एंड्रिकचा धोकादायक शॉट डाव्या हाताने अडवून नॉर्वेची आघाडी कायम ठेवली. झिको यांच्यानंतर विश्वचषकात पेनल्टीवर गोल करू न शकणारा गुइमारेस हा ब्राझीलचा पहिला खेळाडू ठरला आहे. व्हिनिशियस जुनियरऐवजी गुइमारेसला पेनल्टी देण्याच्या निर्णयावर टीका होत असली, तरी नेयमार मैदानाबाहेर असताना आणि राफिन्या जखमी असताना आकडेवारीनुसार गुइमारेस हाच योग्य पर्याय होता, असे प्रशिक्षक कार्लो यांनी सांगितले.

नेयमारचा अलविदा

ईस्ट रुदरफोर्ड

ब्राझीलचा तारांकित फुटबॉलपटू नेयमारने सोमवारी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला अलविदा केला. फिफा विश्वचषकात ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर ३४ वर्षीय नेयमारने हा आपला राष्ट्रीय संघासाठी अखेरचा सामना असल्याचे सांगितले. ऑगस्ट २०१० मध्ये अमेरिकाविरुद्ध मेटलाईफ स्टेडियमवरच नेयमारने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला प्रारंभकेला होता. १६ वर्षांनी तेथेच त्याच्या कारकीर्दीचा शेवट झाला.

"मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले, याच मेटलाईफ स्टेडियमवरून माझा प्रवास सुरू झाला होता आणि तो आज येथेच संपला असून आता सर्व काही संपले आहे," असे नेयमार म्हणाला. नॉर्वेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात तो बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता आणि सामन्याच्या शेवटच्या मिनिटांत त्याने पेनल्टी किकवर ब्राझीलसाठी एकमेव गोल नोंदवला, मात्र तो उजव्या पायाच्या पोटरीला झालेल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही. दुखापतीमुळे नेयमारला या संपूर्ण स्पर्धेत ब्राझीलच्या सामन्यांपैकी केवळ दोनच सामन्यांमध्ये खेळता आले. यापूर्वी साखळी फेरीत स्कॉट लंड विरुद्धच्या सामन्यात तो केवळ १५ मिनिटांसाठी मैदानावर उतरू शकला होता. पाच

गेल्या एका दशकाहून अधिक काळ ब्राझीलचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू राहिलेल्या नेयमारला गेल्या काही वर्षांत दुखापतींनी मोठ्या प्रमाणावर ग्रासले होते, ज्यामुळे त्याच्या कामगिरीवरही मर्यादा आल्या होत्या. एकीकडे विश्वात मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो अशी चर्चा कायम असतानाच नेयमारला मात्र सर्वांचेच प्रेम लाभले. २०१४च्या विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीत तो जायबंदी झाला व उपांत्य फेरीत ब्राझीलला दारुण पराभव पत्करावा लागला होता. क्लब पातळीवर मेस्सी, सुआरेझ यांच्यास ह बार्सिलोनाकडून खेळताना नेयमारने आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यामुळे नेयमारच्या निवृत्तीमुळे ब्राझीलच्या संघात नक्कीच एक पोकळी निर्माण झाली आहे.

कारर्कीदीचा आढावा

  • नेयमार हा चार विश्वचषकात गोल करणारा ब्राझीलचा दुसराच खेळाडू आहे. यापूर्वी फक्त पेले यांनी अशी कामगिरी केली होती.

  • नेयमारने ब्राझीलसाठी सर्वाधिक ८० गोल नोंदवताना देशाचे १३० सामन्यांत प्रतिनिधित्व केले. त्याने पेले यांचा ७७ गोलचा विक्रम मागेच मोडीत काढला होता.

  • २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने पेनल्टी शूटआऊटवर जर्मनीविरुद्ध अखेरचा गोल केला व ब्राझीलचे ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे स्वप्न पूर्ण केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in