न्यूझीलंड-आफ्रिका कसोटी मालिका- न्यूझीलंडकडून आफ्रिकेचा तब्बल २८१ धावांनी फडशा

वेगवान गोलंदाज कायले जेमिसन (५८ धावांत ४ बळी) आणि डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनर (५९ धावांत ३ बळी) यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने बुधवारी पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तब्बल २८१ धावांनी फडशा पाडला.
न्यूझीलंड-आफ्रिका कसोटी मालिका- न्यूझीलंडकडून आफ्रिकेचा तब्बल २८१ धावांनी फडशा

वेलिंग्टन : वेगवान गोलंदाज कायले जेमिसन (५८ धावांत ४ बळी) आणि डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनर (५९ धावांत ३ बळी) यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने बुधवारी पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तब्बल २८१ धावांनी फडशा पाडला. या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

न्यूझीलंडने दिलेल्या ५२९ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा दुसरा डाव चौथ्या दिवशीच ८० षटकांत २४७ धावांत संपुष्टात आला. डेव्हिड बेडिंगहॅमने ९६ चेंडूंत ८७ धावांची अर्धशतकी झुंज दिली. मात्र जेमिसन व सँटनरपुढे अन्य फलंदाजांचा फार काळ निभाव लागू शकला नाही. टिम साऊदी, मॅट हेन्री व ग्लेन फिलिप्स यांनी एकेक गडी बाद केला.

केन विल्यम्सनने या कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकावली. न्यूझीलंडने त्यांचा दुसरा डाव ४ बाद १७९ धावांवर मंगळवारी सायंकाळीच घोषित केला. पहिल्या डावात किवींनी तब्बल ३४९ धावांची आघाडी मिळवली होती. पहिल्या डावात द्विशतक झळकावणारा रचिन रवींद्र सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. उभय संघांतील दुसरी कसोटी १३ फेब्रुवारीपासून सुरू होईल.

न्यूझीलंडच्या विजयामुळे भारताचे नुकसान

न्यूझीलंडने आफ्रिकेला नमवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. त्यामुळे भारताची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. भारताने इंग्लंडविरुद्धची दुसरी कसोटी जिंकून द्वितीय स्थान प्राप्त केले होते. सध्या न्यूझीलंड तीनपैकी दोन विजयांच्या २४ गुण व ६६.६६ या टक्केवारीसह अग्रस्थानी आहे. ऑस्ट्रेलिया ५५ टक्क्यांसह दुसऱ्या, तर भारत ५२..७७ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in