वेलिंग्टन : तारांकित फलंदाज केन विल्यम्सनने (१३२ चेंडूंत १०९ धावा) दुसऱ्या डावातही साकारलेल्या शतकाच्या बळावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीवर भक्कम पकड मिळवली आहे. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ४ बाद १७९ धावा केल्या असून ते तब्बल ५२८ धावांनी आघाडीवर आहेत.
सोमवारच्या ४ बाद ८० धावांवरून पुढे खेळताना आफ्रिकेचा पहिला डाव ७२.५ षटकांत १६२ धावांत आटोपला. मॅट हेन्री व मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी तीन बळी पटकावले. त्यामुळे किवींना तब्बल ३४९ धावांची आघाडी मिळाली. मात्र त्यांनी फॉलोऑन न लादता पुन्हा फलंदाजी केली. पहिल्या डावात ११८ धावा करणाऱ्या विल्यम्सनने यावेळी १२ चौकार व १ षटकारांसह शतक झळकावले. दिवसअखेर डॅरेल मिचेल ११, तर टॉम ब्लंडेल ५ धावांवर खेळत आहे.
विल्यम्सनने कसोटी कारकीर्दीतील ३१वे शतक साकारले. तसेच न्यूझीलंडसाठी कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी ग्लेन टर्नर, जेफ होवार्थ, अँड्रयू जोन्स व पीटर फुल्टन यांनी अशी कामगिरी केली होती.