न्यूझीलंडचा श्रीलंकेवर ६५ धावांनी विजय; शतकवीर ग्लेन फिलिप्स सामनावीर

कर्णधार दसुन शनाका (३२ चेंडूंत ३५) आणि भानुका राजपक्षा (२२ चेंडूंत ३४) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला
न्यूझीलंडचा श्रीलंकेवर ६५ धावांनी विजय; शतकवीर ग्लेन फिलिप्स सामनावीर

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीत न्यूझीलंडने श्रीलंकेवर ६५ धावांनी विजय मिळविला. न्यूझीलंडने या विजयासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. शतकवीर ग्लेन फिलिप्सला (६४ चेंडूंत १०४) सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

विजयासाठी १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रेंट बोल्टच्या (१३ धावांच्या मोबदल्यात चार विकेट‌्‌स) भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा संपूर्ण संघ १९.२ षटकांत १०२ धावांत गारद झाला. श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका (३२ चेंडूंत ३५) आणि भानुका राजपक्षा (२२ चेंडूंत ३४) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. राजपक्षा आणि कर्णधार शनाका यांनी झुंजार खेळी करत संघाला शतकी मजल मारण्यास मदत केली. यामुळे आशिया कप विजेत्या श्रीलंकेवरील मोठ्या पराभवाची नामुष्की टळू शकली. बोल्ट आणि टीम साऊथी यांनी एका क्षणी श्रीलंकेची अवस्था ४ बाद ८ धावा अशी केली होती. बोल्टला (१३ धावांच्या मोबदल्यात चार विकेट‌्‌स) मिचेल सँटनरने दोन विकेट‌्स घेत शानदार साथ दिली. त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत सात गडी गमावून १६७ धावा केल्या. न्यूझीलंडचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना एकट्या ग्लेन फिलिप्सने धडाकेबाज फलंदाजी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ग्लेन फिलिप्सने १०४ धावांची धडाकेबाज शतकी खेळी करत आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मोठा हातभार लावला. ग्लेनच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील हे दुसरे शतक ठरले. ग्लेन फिलिप्सने ६४ चेंडूंत १०४ धावांची तुफानी खेळी करताना तब्बल चार षटकार आणि दहा चौकारांची आतषबाजी केली. त्याला वानिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर एक जीवदानही मिळाले आणि तोच सोडलेला झेल श्रीलंकेला महागात पडला. डॅरिल मिशेलने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना २४ चेंडूंत २२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. श्रीलंकेने न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १५ धावा अशी केली होती, मात्र त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि डॅरेल मिशेलने चौथ्या विकेटसाठी ८४ धावांची झुंजार भागीदारी रचली. मिचेल सँटनरने ५ चेंडूंत नाबाद ११ धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून कुसल रजिथाने दोन विकेट्स घेतले. टीम साऊथीने नाबाद ४ धावा केल्या. हसरंगा, तीक्ष्णा, डिसिल्वा आणि लाहिरू कुमाराने प्रत्येकी एक विकेट मिळविली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in