NZ vs ENG, ICC T20 World Cup 2026 : न्यूझीलंडच्या मार्गात आज इंग्लंडचा अडथळा

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या निर्धाराना मैदानात उतरेल.
NZ vs ENG, ICC T20 World Cup 2026 : न्यूझीलंडच्या मार्गात आज इंग्लंडचा अडथळा
(Photo-X/@WicketWatcher_)
Published on

कोलंबो : टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या निर्धाराना मैदानात उतरेल. मात्र त्यांच्या मार्गात इंग्लंडचा अडथळा असेल. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर सुपर-आठ फेरीतील दुसऱ्या गटात उभय संघ आमनेसामने येतील. इंग्लंडने आधीच उपांत्य फेरीतील स्थान पक्के केलेले आहे. मात्र त्यांनी न्यूझीलंडला नमवल्यास पाकिस्तानच्या आशा बळावतील.

भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेत यंदाही गेल्या वेळेप्रमाणे २० संघ सहभागी झाले आहेत. भारत २०१६नंतर प्रथमच टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. रोहितच्या नेतृत्वात २०२४मध्ये भारताने टी-२० विश्वचषक उंचावला. आता भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल.

या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. त्यांपैकी अ-गटातून भारत, पाकिस्तान, ब-गटातून झिम्बाब्वे, श्रीलंका, क-गटातून वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ड-गटातून दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांनी आगेकूच केली. आता सुपर-आठ फेरीत दोन गट तयार करण्यात आले आहेत. यांपैकी पहिल्या गटात भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे, तर दुसऱ्या गटात इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका हे संघ आहेत.

मिचेल सँटनरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या न्यूझीलंडचा सुपर-आठ फेरीतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. मग दुसऱ्या लढतीत त्यांनी श्रीलंकेला सहज धूळ चारली. त्यामुळे २ सामन्यांत ३ गुण असलेल्या किवी संघाने इंग्लंडला नमवले किंवा पावसामुळे ही लढत रद्द जरी झाली, तरी न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत दाखल होईल. ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम सेईफर्ट, डॅरेल मिचेल असे प्रतिभावान खेळाडू किवी संघात असून गोलंदाजीत मॅट हेन्री व लॉकी फर्ग्युसनही कमाल करत आहे.

दुसरीकडे हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात इंग्लंडने सुपर-आठ फेरीत सलग दोन सामने जिंकताना श्रीलंका व पाकिस्तानला नेस्तनाबूत केले. आता त्यांना न्यूझीलंडविरुद्ध प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याची संधी आहे. मात्र पाकिस्तानचे चाहते इंग्लंडने ही लढत जिंकावी, अशी प्रार्थना करतील. कारण पाकिस्तान सध्या एका गुणावर असून त्यांची शनिवारी श्रीलंकेशी गाठ पडणार आहे. मात्र यासाठी न्यूझीलंड पराभूत होणे गरजेचे आहे.

दरम्यान, या लढतीवर पावसाचे सावट आहे. यंदा येथे सहापैकी एकाच लढतीत धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे.

प्रतिस्पर्धी संघ

इंग्लंड : हॅरी ब्रूक (कर्णधार), बेन डकेट, जोफ्रा आर्चर, रेहान अहमद, जोश टंग, लुक वूड, सॅम करन, फिल सॉल्ट (यष्टिरक्षक), जोस बटलर, जेमी ओव्हर्टन, जेकब बेथल, लियाम डॉसन, विल जॅक्स, आदिल रशिद, टॉम बँटन.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), रचिन रवींद्र, कायले जेमिसन, फिन ॲलन, मॅट हेन्री, ग्लेन फिलिप्स, जेकब डफी, टिम सेईफर्ट, जेम्स नीशाम, इश सोधी, लॉकी फर्ग्युसन, डॅरेल मिचेल, मार्क चॅपमन, डेवान कॉन्वे, कोल मॅकोन्ची.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in