आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करताना नील वॅगनरला अश्रू अनावर

न्यूझीलंडचा ३७ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करताना नील वॅगनरला अश्रू अनावर
Published on

वेलिंग्टन : न्यूझीलंडचा ३७ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. वॅगनरने ‘कसोटी स्पेशलिस्ट’ची भूमिका गेली १२ वर्षे प्रभावीपणे निभावली. त्याला एकदिवसीय व टी-२० प्रकारांत मात्र किवी संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी कधीच लाभली नाही.

आफ्रिकेत जन्मलेला वॅगनर २००८मध्ये न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला. मग त्याने न्यूझीलंडमधील प्रथम श्रेणी स्पर्धेत सातत्याने छाप पाडली. २०१२मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वॅगनरने कसोटीत पदार्पण केले. वॅगनरने ६४ कसोटींमध्ये किवींचे प्रतिनिधित्व करताना २७.५७च्या सरासरीने २६० बळी मिळवले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी वॅगनरचा न्यूझीलंडच्या संघात समावेश करण्यात आला होता. मात्र प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी अंतिम ११ खेळाडूंत त्याला स्थान मिळणे कठीण आहे, हे स्पष्ट करताच वॅगनरने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. याविषयी आपण गेल्या काही आठवड्यांपासूनच विचार करत आहोत, असे अश्रू अनावर झालेल्या वॅगनरने पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी स्टेडसुद्धा वॅगनरसह उपस्थित होते.

२०२१मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा न्यूझीलंडला जिंकवून देण्यात वॅगनरचा मोलाचा वाटा होता. वॅगनर खेळलेल्या ६४ कसोटींपैकी ३४ लढतींमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला.

गेल्या काही आठवड्यांचा काळ माझ्यासाठी फारच भावनिक होता. कसोटी क्रिकेटने मला भरपूर काही दिले. मात्र थांबण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते. कसोटी क्रिकेटपटू म्हणून न्यूझीलंडसाठी शक्य होईल, तितके योगदान दिले. आता अन्य खेळाडूंना संधी मिळणे गरजेचे आहे.

- नील वॅगनर

न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका आजपासून

न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला २९ फेब्रुवारीपासून वेलिंग्टन येथे प्रारंभ होईल. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री ३.३० वाजता ही लढत सुरू होईल. टीम साऊदीच्या न्यूझीलंडला खेळाडूंच्या दुखापतींनी भेडसावले आहे. तसेच कायले जेमिसन या मालिकेला मुकणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघात सलामीवीर स्टीव्ह स्मिथच्या कामगिरीकडे लक्ष असेल.

logo
marathi.freepressjournal.in