

वेलिंग्टन : भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघाला दुखापतीचा धक्का बसला असून मार्क चॅपमन आणि झंक फॉल्क्स हे दोघेही या मालिकेतून बाहेर झाले आहेत. रचिन रवींद्र आधीच खांद्याच्या दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या चिंतेत भर पडली आहे.
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून २२ ऑक्टोबरपासून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेद्वारे या दौऱ्याला प्रारंभहोणार आहे. मागील महिन्यात युरोपियन टी-२० लीगदरम्यान डाव्या पायाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे चॅपमन सध्या सावरत आहे. तर वेगवान गोलंदाज फॉल्क्स कॅन्टरबरीच्या सराव सत्रादरम्यान उजव्या पायाला दुखापत करून बसला. चॅपमन हा डाव्या हाताचा फलंदाज असून त्याने ११३ टी-२० सामने खेळले आहेत.
भारताविद्ध आगामी एकदिवसीय मालिकेसाठी तो संघात पुनरागमन करण्यास तयार आहे. मात्र, फॉल्क्सच्या पुनरागमनाची कोणतीही निश्चित तारीख समोर आलेली नाही. या दुखापतग्रस्त जोडीच्या जागी अष्टपैलू जोश क्लार्कसन आणि वेगवान गोलंदाज ब्लेर टिकनर यांची संघात निवड करण्यात आली आहे. उभय संघांत ५ टी-२०, ५ एकदिवसीय व २ कसोटी सामने होणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे लक्ष लागून आहे.
न्यूझीलंड संघ
मिचेल सँटनर (कर्णधार), फिन अॅलन, मिचेल ब्रेसवेल, जोश क्लार्कसन, डेवॉन कॉन्वे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, बेव्हन जेकब्स, कायले जेमिसन, अॅडम मिल्ने, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम सेईफर्ट, नॅथन स्मिथ, ब्लेर टिकनर.