

ख्राईस्टचर्च : वेगवान गोलंदाज जेकब डफी (४२ धावांत ५ बळी) व फिरकीपटू एजाझ पटेल (२३ धावांत ३ बळी) यांच्यासमोर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव पाचव्या दिवशी ढेपाळला. त्यामुळे न्यूझीलंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात विंडीजचा ३२३ धावांनी फडशा पाडला व मालिकेत २-० असे यश संपादन केले.
उभय संघांतील या कसोटीत विंडीजसमोर विजयासाठी ४६२ धावांचे लक्ष्य होते. चौथ्या दिवसअखेर त्यांनी बिनबाद ४३ धावा केल्या होत्या. मात्र सोमवारी पाचव्या दिवशी त्यांचा दुसरा डाव ८०.३ षटकांत १३८ धावांत आटोपला. ८७ धावांवर विंडीजचा पहिला बळी गेला. ब्रँडन किंग ६७ धावांच्या झुंजीनंतर बाद झाला. त्यानंतर विंडीजचा संघ ढेपाळला. शाय होप (३), कर्णधार रॉस्टन चेस (५), अलिक अथांझे (२) यांनी निराशा केली. त्यामुळे विंडीजवर मालिका पराभवाची नामुष्की ओढवली. डफीने पाच, तर पटेलने ३ बळी मिळवून किंवीचा विजय साकारला. डफीला आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने खरेदी केले आहे. टी-२०मध्ये तो क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. तसेच त्याने वर्षभरात न्यूझीलंडसाठी कसोटीमध्ये ८१ बळी मिळवले. त्याने सर रिचर्ड हॅडली यांचा १९८५मधील ७९ कसोटी बळींचा विक्रम मोडीत काढला.
सामन्यांतील दोन डावांत अनुक्रमे २२७ व १०० धावा करणारा डेवॉन कॉन्वे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तर मालिकेत तब्बल २३ बळी मिळवणारा डफी मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. याबरोबरच विंडीजचा न्यूझीलंड दौरा समाप्त झाला. टी-२० मालिकेत न्यूझीलंडने ३-१ असे, एकदिवसीय मालिकेत ३-० असे, तर कसोटी मालिकेत २-० असे यश मिळवले.
पहिली लढत विंडीजने झुंज देत अनिर्णित राखली. मात्र दुसऱ्या लढतीत किवी संघाने बाजी मारली. तिसऱ्या सामन्यात लॅथम व कॉन्वे यांच्यासमोर विंडीजच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. लॅथम कसोटीतील १६वे, तर कॉन्वेने सातवे शतक साकारले. या दोघांनी पहिल्या डावात ३२३ धावांची, तर दुसऱ्या डावात १९२ धावांची सलामी नोंदवली होती. त्यामुळे विंडीज आधीच पिछाडीवर पडली.