

नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या महिला संघाने बुधवारी महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविक्रमी धावसंख्येचा पाठलाग केला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर २ गडी व २ चेंडू राखून विजय मिळवताना ३४६ धावांचे लक्ष्य गाठले. अमेलिया करने १३९ चेंडूंत नाबाद १७९ धावांची खेळी साकारली. त्यामुळे न्यूझीलंडने भारताचा विक्रम मोडीत काढला. भारताने विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३३८ धावांचा पाठलाग केला होता.
दरम्यान, न्यूझीलंडच्या विश्वविक्रमानंतरही सध्या सगळीकडे चर्चा मात्र आयपीएलचीच सुरू आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. आता २० दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला धडाक्यात प्रारंभ झाला. पहिल्या दोन लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला. तर अन्य सामन्यांत गोलंदाजांनी कमबॅक केले. तसेच चार लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे नाणेफेक व दवाचा घटक यावेळी निर्णायक ठरत आहे. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील.
तसेच गुवाहाटी येथील बारस्परा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या लढतीत महेंद्रसिंह धोनीची अनुपस्थिती चेन्नईला महागात पडली. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईचा डाव १९.४ षटकांत १२७ धावांतच आटोपला. जडेजाने शिवम दुबे (६) व सर्फराझ खान (१७) यांचे बळी मिळवले. नांद्रे बर्गरने भेदक गोलंदाजीने संजू सॅमसन (६) व आयुष म्हात्रे (६) यांना माघारी पाठवले. जोफ्रा आर्चरने ऋतुराजचा अडसर दूर केला. जेमी ओव्हर्टनने ३६ चेंडूंत ४३ धावा फटकावून चेन्नईला किमान १०० धावांपलीकडे नेले. जडेजा, बर्गर व आर्चर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने १२.१ षटकांतच विजय मिळवला. वैभवने ४ चौकार व ५ षटकारांसह ५२ धावा फटकावल्या. त्याचे हे राजस्थानसाठी दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक ठरले. यशस्वी जैस्वाल (नाबाद ३८) व ध्रुव जुरेल (१८) यांनी वैभवला उपयुक्त साथ दिली. या लढतीत जडेजाने घेतलेले २ बळी निर्णायक ठरले. त्यानंतर सामना झाल्यावर त्याने खलिल अहमदच्या जर्सीवरील चेन्नईच्या लोगोचे चुंबन घेतले.